देशातील एअरलाईनमध्ये आता आणखी एका एअरलाईनचे नाव आले आहे. शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या अकासा एअरलाईनला डीजीसीएची परवानगी मिळाली आहे. गुरुवारी या कंपनीला लायसन मिळाले आहे.
एअरलाईनने याबाबत माहिती दिली आहे. अकासाकडे सध्या एक विमान आहे. आणखी एक विमान काही दिवसांत कंपनीकडे येईल. एकूण ७२ बोइंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर कंपनीने दिली आहे. या दोन विमानांसह ही कंपनी देशांतर्गत विमानोड्डाणे सुरु करणार आहे.
अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी सांगितले की, एओसी प्रक्रियेवेळी दिलेल्या मदतीबाबत आम्ही डीजीसीएचे आभारी आहोत. जुलैच्या अखेरपर्यंत एअरलाईन उड्डाणे सुरु करेल. अकासाला पहिले विमान २१ जूनला मिळाले आहे.
Akasa Air gets an airline license from DGCA. The airline can start operations: DGCA pic.twitter.com/zBeE3J2Vlk
— ANI (@ANI) July 7, 2022
अकासाने गेल्या नोव्हेंबरमध्ये बोईंग कंपनीला विमानांची मोठी ऑर्डर दिली होती. यापौकी १८ विमाने २०२३ पर्यंत मिळणार आहेत. अन्य विमाने पुढील चार वर्षांत दिली जाणार आहेत. अकासा एअर सुरुवातीला टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये विमानसेवा देणार आहे. ही एक परवडणारी विमान सेवा असेल, असे सांगितले जात आहे.
कंपनीला क्यूपी कोड देण्यात आला आहे. तसेच कंपनीने क्रू मेंबरचा ड्रेस हा समुद्रात सापडलेल्या टाकाऊ प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.