नवी दिल्ली: शेअर मार्केटमध्ये मोठा दबदबा असणारे आणि बाजाराचे बिग बुल म्हणून ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांनी एअरलाइन्स सेवा क्षेत्रात प्रवेश केला असून, त्यांची अकासा एअरलाइन लवकरच हवेत झेपावणार आहे. बोइंग कंपनीला विमानांची ऑर्डर दिल्यानंतर आता पायलट्सचे ट्रेनिंग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
राकेश झुनझुनवाला यांची गणना देशातील अब्जाधीश लोकांमध्ये केली जाते. गत वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी नागरी विमान उड्डाण क्षेत्रात प्रवेश करत असल्याची घोषणा केली होती. राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरलाइन्सला आता उड्डाणाचे वेध लागले आहेत. कंपनीने वैमानिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून, जुलैपासून अकासाची विमाने हवेत झेपावतील, असा विश्वास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. यापूर्वी अकासा एअरलाइन्सची सेवा जूनमध्ये सुरू होईल, असे सांगितले गेले होते.
केबिन क्रू आणि इतर स्टाफची भरती सुरु
अकासा एअरलाईन्सने पायलट्स, केबिन क्रू आणि इतर स्टाफची भरती सुरु केली आहे. १५४ वैमानिक आणि ११५ केबिन क्रूची नियु्क्ती करण्यात आली आहे. कंपनीनं हरियाणामधील गुडगांव येथे सुमारे १४००० चौरस फुटांचे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. विमान तयार करणाऱ्या बोइंग कंपनीला बोइंग मॅक्स ७३७ ही ७२ नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यातील काही विमाने जून महिन्यात कंपनीला प्राप्त होतील, असे अकासा एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अकासाची सेवा जुलै २०२२ पासून सुरु होईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्ससाठी सुमारे २४७.५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अकासा एअरलाइन्ससाठी अनुभवी लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. ज्यात इंडिगोचे माजी सीईओ आदित्य घोष आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांचा समावेश आहे.