शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची सुरूवात केली होती. आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण १०० डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स १५० अकांवर होता, जो आता ६० हजारांच्या स्तरावर आहे.
झुनझुनवाला यांची यशाची कहाणी केवळ ५ हजार रूपयांपासून सुरू होती. आज त्यांचं नेटवर्थ जवळपास ४० हजार कोटी रूपये आहे. त्यांच्या याच यशामुळे त्यांना भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असं म्हटलं जातं.