Rakesh Jhunjhunwala Death Anniversary: आज(14 ऑगस्ट 2024) शेअर मार्केटचे 'बिग बुल' अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांनी जगाचा निरोप घेऊन दोन वर्षे झाली, पण त्यांचे गुंतवणुकीचे सल्ले आजही अनेकांना फायद्याचे ठरतात. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक असा शेअर आहे, ज्याने त्यांना सर्वाधिक फायदा करुन दिला आहे.
कोणता आहे तो शेअर?झुनझुनवालांना सर्वाधिक फायदा करुन देणारा शेअर टायटन कंपनीचा आहे. झुनझुनवालांचे मित्र रमेश दमानी यांनी एका मुलाखतीत त्या शेअरबद्दल सांगितले आहे. झुनझुनवालांनी पहिल्यांदा टायटनचे शेअर्स कसे खरेदी केले आणि ती त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक परतावा देणारी कंपनी कशी ठरली, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. दमानी सांगतात की, ही गोष्ट 2003 ची आहे, एका ब्रोकरने झुनझुनवालांना फोन केला आणि टायटनचे 10 लाख शेअर्स विक्री असल्याची माहिती दिली.
टायटनचे शेअर्स 40 रुपये दराने विकत घेतलेझुनझुनवाला यांना त्यावेळी रु. 300 कोटी मार्केट कॅप असलेला टायटन एक उत्तम ब्रँड वाटला. सुरुवातीला त्यांनी सर्वात लहान लॉट विकत घेतला. यानंतर त्यांनी कंपनीची माहिती काढली आणि पुढील काही वर्षात टायटनचे आणखी शेअर्स विकत घेणे सुरू केले. हळुहळू त्यांची कंपनीतील हिस्सेदारी 5 टक्क्यांपर्यंत वाढली. लोकांना वाटते की, झुनझुनवालांनी खूप अभ्यास करुन टायटनचे शेअर्स खरेदी केले होते, पण तसे नव्हते. एका ब्रोकरच्या कॉलमुळे त्यांना टायटनचे शेअर्स मिळाले.
1985 पासून बाजारात गुंतवणूक करायचेदरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5,000 रुपयांपासून शेअर बाजारातगुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $5.8 अब्ज होती. झुनझुनवाला यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, इथे कोणीही मार्केट किंग नाही, ज्यांना असे वाटले, ते तुरुंगात गेले. हवामान, मृत्यू, बाजार आणि महिलांचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी संयमाने काम करणे गरजेचे आहे.