Join us  

Rakesh Jhunjhunwala मोठा झटका! केवळ ५ मिनिटांत ४०० कोटी बुडाले; ‘या’ शेअर्समुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 4:56 PM

शेअर बाजार तब्बल १४०० अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे ६.३२ लाख कोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा थेट परिणाम जगासह भारतावरही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलापासून ते सोने-चांदीपर्यंत अनेक गोष्टींनी उच्चांकी दर गाठला आहे. शेअर मार्केटवरही याचा प्रभाव पाहायला मिळाला. सोमवारी बाजार संपला, तेव्हा मुंबई शेअर बाजार १४०२ अंकांनी, तर निफ्टीमध्ये ३६६ अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ६.३२ लाख कोटी रुपये बुडाल्याचे सांगितले जात आहे. शेअर बाजाराचे बिग बूल अशी ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांनाही या घसरणीचा मोठा फटका बसला असून, केवळ ५ मिनिटांत ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. 

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचे दोन मोठे समभाग असलेल्या टायटन आणि स्टार हेल्थ यांमुळे राकेश झुनझुनवाला यांना खूप तोटा सहन करावा लागला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटन आणि स्टार हेल्थमध्ये मोठी गुंतवणूक आहे. या दोन समभागांमध्ये होणारी प्रचंड हालचाल त्यांच्या पोर्टफोलिओला धक्का देण्यासाठी पुरेशी असल्याचे म्हटले जात आहे. 

टायटन, स्टार हेल्थचे शेअर गडगडले

टायटन कंपनीचा शेअर सोमवारी सकाळी २६ रुपयांच्या शेअरच्या घसरणीसह खुला झाला. त्यानंतर या शेअरमध्ये ५७ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे, स्टार हेल्थच्या शेअरची किंमत सुमारे ५ रुपयांची घसरण झाली. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ३,५७,१०,३९५ शेअर्स आहेत, तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ९५,४०,५७५ शेअर्स आहेत. तर, झुनझुनवाला दाम्पत्याकडे कंपनीत ४,५२,५०,९७० शेअर्ससह ५.०९ टक्के हिस्सा आहे. तर स्टार हेल्थ कंपनीत झुनझुनवाला दाम्पत्याची १७.५० टक्के गुंतवणूक आहे. 

दरम्यान, सोमवारी बाजार बंद होताना मेटल सोडले तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये २ ते ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये प्रत्येकी २ टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी ८३७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर २५४३ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच १२९ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.  

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजार