Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या लाटेमध्ये वाहून गेली बाजारातील तेजी

विक्रीच्या लाटेमध्ये वाहून गेली बाजारातील तेजी

मागील सप्ताहात संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टीने गाठलेल्या सार्वकालीक उच्चांकानंतर बाजारात विक्रीची लाट आली आणि निर्देशांकांमधील

By admin | Published: May 8, 2017 12:28 AM2017-05-08T00:28:10+5:302017-05-08T00:28:10+5:30

मागील सप्ताहात संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टीने गाठलेल्या सार्वकालीक उच्चांकानंतर बाजारात विक्रीची लाट आली आणि निर्देशांकांमधील

The rally in the market led to the surge in sales | विक्रीच्या लाटेमध्ये वाहून गेली बाजारातील तेजी

विक्रीच्या लाटेमध्ये वाहून गेली बाजारातील तेजी

मागील सप्ताहात संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टीने गाठलेल्या सार्वकालीक उच्चांकानंतर बाजारात विक्रीची लाट आली आणि निर्देशांकांमधील वाढ त्यामध्ये वाहून गेली. बॅँकांच्या बुडीत कर्जाबाबत रिझर्व्ह बॅँकेला अधिकार देणारा वटहुकूम, पोलाद धोरणाची केलेली घोषणा आणि अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर यामुळे बाजारात आलेला उत्साह विक्रीमुळे संपला आणि निर्देशांकामध्ये घट झाली.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये गतसप्ताहामध्ये ५९.६० अंशांनी घट होऊन तो २९,८५८.८० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९३०० अंशांची पातळी राखू शकला नाही. त्यामध्ये ०.२० टक्कयांनी घट होऊन तो ९२८५.३० अंशांवर बंद झाला.
शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी सार्वकालीक उच्चांक गाठल्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव येण्याची शक्यता होती. त्यानुसार सप्ताहाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे बाजारात झालेली सर्व वाढ वाहून गेली.
गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था आणि संस्थात्मक गुंतवणुकदारांनी भारतीय बाजारामधून ९३०.८५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.बाजारातील उलाढाल मागील सप्ताहापेक्षा बरीच कमी झालेली दिसून आली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सध्यातरी व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील मंदीची स्थिती तात्पुरती असून आधी ठरविल्यानुसार चालू आर्थिक वर्षामध्ये आणखी दोन वेळा व्याजदरांमध्ये वाढ होऊ शकेल, असे मतही फेडरल रिझर्व्हने व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने बॅँकांच्या बुडीत कर्जांबाबत रिझर्व्ह बॅँकेला अधिक अधिकार देणारा काढलेला वटहुकूम आणि जाहीर केलेले राष्ट्रीय पोलाद धोरण यामुळे बाजारात उत्साह असला तरी गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळेच अखेरच्या दिवशी मोठी विक्री झाली.

परकीय चलन गंगाजळी सर्वाेच्च पातळीवर

देशाच्या परकीय चलन गंगाजळीने आतापर्यंतची उच्चांकी ३७२.७३ अब्ज अमेरिकन डॉलर अशी पातळी गाठली आहे. २८ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहातील ही स्थिती असल्याचे भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केले आहे. या सप्ताहामध्ये गंगाजळीत १.५९४ अब्ज डॉलरची वाढ झाल्याने ही सर्वाेच्च पातळी गाठता आली आहे.

३० सप्टेंबर, २०१६ रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये यापूर्वी परकीय चलन गंगाजळीने उच्चांक गाठला होता. त्यावेळी गंगाजळीतील शिल्लक ३७१.९९ अब्ज डॉलर एवढी होती. २१ एप्रिल, २०१७ रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये गंगाजळी या पातळीच्या जवळ ३७१.१४ अब्ज डॉलरवर आली होती.

गंगाजळी ही डॉलरमध्ये मोजली जात असते. त्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येनच्या किंमतीमध्ये होणारा बदल लक्षात घेऊन त्यांचे डॉलरमधील मूल्य मोजले जाते.

Web Title: The rally in the market led to the surge in sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.