Join us

अयोध्येला विमानाने जाणे महागले; जाणून घ्या राम दर्शनासाठी फ्लाईटचे भाडे किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:38 PM

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच पर्यटकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. याचा परिणाम हॉटेल, ट्रेन आणि आता विमान भाड्यावर होत आहे.

उत्तर प्रदेश येथील अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार सुरू आहे. दरम्यान, आता अयोध्येतील विमानतळही सुरू झाले असून विमानानेही अयोध्येसाठी जाता येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच विमानाचे भाडेही वाढले आहे. अयोध्येला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांपेक्षा जास्त झाले आहे. 

एका झटक्यात १७ टक्क्यांपर्यंत वाढला Sula Vineyards चा शेअर, वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच पर्यटकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. याचा परिणाम हॉटेल, ट्रेन आणि आता विमान भाड्यावर होत आहे. १९ जानेवारीचे मुंबई ते अयोध्येचे तिकीट तपासल्यावर, इंडिगो फ्लाईटचे भाडे २०,७०० रुपये दाखवले आहे. तर २० जानेवारीच्या विमान प्रवासाचे भाडेही सुमारे २० हजार रुपये असल्याचे दिसते. जवळपास सर्वच विमान कंपन्यांची हीच अवस्था आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येला जाणारे विमान भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गावरील भाड्यापेक्षा जास्त आहे. १९ जानेवारीच्याच मुंबई ते सिंगापूरच्या फ्लाईटची तपासणी केली असता, एअर इंडियाच्या थेट फ्लाइटचे भाडे १०,९८७ रुपये दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १९ जानेवारी रोजी मुंबई ते बँकॉक थेट विमानाचे भाडे १३,८०० रुपये आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी नवीन विमानतळ तयार झाले आहे. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इंडिगो या दोनच विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे.

मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत अनेक प्रकारच्या व्यावसायिक कामांची उलाढाल पाहायला मिळत आहे. आगामी काळात संभाव्य मागणी आणि प्रचंड पर्यटन बाजारपेठ या अपेक्षेने अनेक कंपन्या तयारी करत आहेत. हॉस्पिटॅलिटी फर्म ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी आठवड्यापूर्वी सांगितले होते की लोक अयोध्येसाठी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स शोधत आहेत. 

टॅग्स :अयोध्याराम मंदिरविमान