हरिद्वार : योग गुरू रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखालील पतंजली उद्योग समूहाने तीन वर्षांपूर्वी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना मात देत वाहवा मिळविली पण कंपनीच्या वृद्धीला आता आहोटी लागली असून, विक्रीत मोठी घट झाली आहे. एका वृत्तानुसार, २०१६-१७ मध्ये पतंजलीची उत्पादने लोकप्रियतेच्या शिखरावर होती. या उलाढालीचे आकडे बघून बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘कपालभाती’ करावा लागेल, असे वक्तव्य तेव्हा रामदेव बाबा यांनी केले होते. मार्च २०१८ च्या वित्त वर्षात कंपनीची विक्री २०० अब्ज रुपयांवर नेण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी बोलून दाखविली होती. प्रत्यक्षात विक्री १० टक्क्यांनी घटून ८१ अब्जांवर आली असल्याचे कंपनीच्या अहवालात दिसते. गेल्या वर्षात विक्री आणखी घटली असेल अशी शक्यता आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच्या पहिल्या नऊ महिन्यांतील विक्री अवघी ४७ अब्ज होती, असे कंपनी सूत्रांनी सांगितले.
कंपनीने उचललेली काही चुकीची पावले या पिछेहाटीस कारणीभूत असल्याचे दिसते. पतंजलीचा विस्तार झपाट्याने झाल्याने कंपनीला इतर उत्पादकांकडून उत्पादने तयार करून घ्यावी लागली. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. वाहतुकीसाठी कंपनीने दीर्घकालीन करार न केल्याने कंपनीचे नियोजन बिघडले. खर्चही वाढला. कंपनीकडे विक्रीवर देखरेख ठेवणारे आवश्यक सॉफ्टवेअर नाही. त्यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाली. काही पुरवठादारांची बिले कंपनीने थकवली आहेत. त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे.
जाहिरातींवरील खर्च केला कमी
एफएमसीजी क्षेत्रात जवळपास २,५०० उत्पादने कंपनी विकते. कपडे, सौर पॅनल यासारख्या इतर काही क्षेत्रांतही कंपनीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.
पतंजलीचा जाहिरांतीवरील खर्च कमी झाला आहे. २०१६ मध्ये टीव्हीवरील जाहिरातींच्या बाबतीत पंतजली समूह प्रथम क्रमांकावर होता. गेल्या वर्षी मात्र तो टॉप-१० मध्येसुद्धा आला नाही.