नवी दिल्ली : अदानी समूहातील (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये गेल्या २० दिवसांत ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यादरम्यान, असाच एक शेअर आहे, ज्याकडे अजून कोणाचे लक्ष गेले नाही. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत जवळपास ७००० कोटींचा फटका कंपनीला बसला आहे. कंपनीचा शेअर अजूनही विक्रीच्या टप्प्यातून जात आहे.
एक वर्षापूर्वी कंपनीचा शेअर जवळपास ७०० रुपयांच्या आसपास होता. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये अनपेक्षित तेजी आली. महिन्याभरापूर्वीच कंपनीचा शेअर १४९५ रुपयांच्या आपल्या उच्चांकावर पोहोचला होता. २४ जानेवारी रोजी पतंजली फूड्स लिमिटेडचा शेअर १२०८ रुपये होता. ३ जानेवारीला तो ९०७ रुपयांपर्यंत खाली आला. ३ फेब्रुवारीला कंपनीचे मार्केट कॅप ३२८२५.६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. तर जानेवारीला ते ४०००० कोटी होते. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीचे मार्केट कॅप ५१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. पाच महिन्यात १८००० कोटी रुपयांचा कंपनीला फटका बसला आहे.
पतंजलीचा निव्वळ नफा २६ टक्के वाढलाशेअर्सच्या घसरणीचे कारण बाजारातील बदलती परिस्थिती असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, पतंजली फूड्सने गेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये कंपनीला २६ टक्के निव्वळ नफा मिळाला आहे. पण, कच्च्या सोयाबीन तेलाची आयात बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या पुढील तिमाही निकालांवर दिसून येईल.
अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, परंतु कुणाला काही अंदाज नव्हता की आशियातील सर्वात मोठा उद्योगपती एका मोठ्या कचाट्यात सापडणार आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला आणि अदानींच्या शेअर्सने गटांगळी घेण्यास सुरुवात केली. गौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. तोपर्यंत हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला नव्हता. शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार ३ फेब्रुवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५९ अब्ज डॉलरवर आली, म्हणजे त्यांची निम्म्याहून अधिक संपत्ती नष्ट झाली आहे.