Join us

राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 03:45 IST

येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रवास क्षेत्रातील कंपनी ‘कोक्स अँड किंग्ज लिमिटेड’कडून  ३,६४२ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करू नका, अशा सूचना येस बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि सहसंस्थापक राणा कपूर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असे ईडीने म्हटले आहे.

येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे. ईडीने म्हटले आहे की, कोक्स अँड किंग्जने ब्रिटनमधील आपली ‘हॉलिडे ब्रेक एज्युकेशन’ ही संस्था जानेवारी २०१९ मध्ये ४,३८७ कोटी रुपयांना विकली होती. या व्यवहारातील पैसे हाती असतानाही येस बँकेचे ३,६४२ कोटी रुपयांचे थकीत कर्ज भरण्याचे कंपनीने टाळले. त्याचवेळी बँकेचे चेअरमन राणा कपूर यांनी कंपनीकडून कोणत्याही प्रकारे वसुली करण्यात येऊ नये, अशा सूचना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे. 

ईडीने म्हटले की, कोक्स अँड किंग्जने हॉलिडे ब्रेक एज्युकेशनच्या विक्रीतून आलेला पैसा गैरमार्गांनी अन्यत्र वळविला, तर दुसरीकडे बँकांकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज थकवून ठेवले. बँका आणि वित्तीय संस्थांचे मिळून ५,५०० कोटी रुपयांचे कर्ज कोक्स अँड किंग्जने थकविले. 

टॅग्स :येस बँकगुन्हेगारी