नवी दिल्ली : देशातील दारिद्र्यरेषा ठरविण्याच्या तेंडुलकर समितीने ठरविलेल्या निकषांवर फेरविचार करण्यासाठी नेमलेल्या डॉ. सी. रंगराजन समितीने आपला अहवाल केंद्रीय नियोजनमंत्री राव इंद्रजित सिंग यांच्याकडे सादर केला आहे.पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे प्रमुख डॉ. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने मे २०१२ मध्ये ही समिती नेमली होती. समितीने सात ते नऊ महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित होते. परंतु समितीला वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. त्यातील वाढीव मुदतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी समितीने आपला अहवाल सादर केला आहे.‘मी काल (सोमवारी) दिल्लीत नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग यांची भेट घेतली व दारिद्र्याच्या निकषांसंबंधीचा अहवाल त्यांना सादर केला,’ असे डॉ. रंगराजन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.या अहवालात काय शिफारशी केल्या गेल्या आहेत, असे विचारता डॉ. रंगराजन म्हणाले की, ते मी उघड करणे योग्य होणार नाही. आता या अहवालावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे.नियोजन आयोगाने तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार देशातील दारिद्य्ररेषेची व्याख्या करून तसे प्रतिज्ञापत्र सप्टेंबर २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केले तेव्हा मोठा गहजब झाला होता. त्या प्रतिज्ञापत्रानुसार शहरी भागात दररोज ३२ रुपयांहून अधिक खर्च करणारी व ग्रामीण भागात दररोज २६ रुपयांहून अधिक खर्च करणारी कुटुंबे दारिद्य्ररेषेबाहेर मानली गेली होती. यावरून वाद झाल्यानंतर त्यावेळचे नियोजनमंत्री अश्विनी कुमार यांनी तेंडुलकर समितीच्या निकषांवर फेरविचार करण्याची गरज मान्य केली होती व त्यासाठीच डॉ. रंगराजन समितीकडे हे काम सोपविण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दारिद्र्याच्या निकषांवर रंगराजन यांचा अहवाल
By admin | Published: July 02, 2014 4:00 AM