Join us

Coronavirus : कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या कंपन्यांत वेगाने सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 9:21 AM

सीआयआयचा अहवाल : मागील लॉकडाऊनपेक्षा वेग अधिक

ठळक मुद्देसीआयआयचा अहवाल : मागील लॉकडाऊनपेक्षा वेग अधिकग्राहकांवरील परिणामाबाबत मतभेद

देशातील मोठ्या कंपन्यांत कोविड - १९ साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर होणारी सुधारणा पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक गतिमान आहे, असे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) केलेल्या सीईओ सर्वेक्षणात आढळून आले आहे. देशातील ११९ मोठ्या कंपन्या या सर्वेक्षणात सहभागी झाल्या आहेत. यातील ५९ कंपन्यांच्या विक्रीत कोविड - १९ साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर २०२० मधील पहिल्या लाटेच्या तुलनेत चांगली सुधारणा झाल्याचे आढळून आले. 

सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन तसेच निर्बंध सरसकट नव्हते. स्थानिक पातळीवर गर्दी टाळता  येईल, अशा पद्धतीने ते लावण्यात आले होते. त्यामुळे त्याचा आर्थिक परिणामही स्थानिक पातळीपुरताच मर्यादित राहिला. 

सर्वेक्षण अहवालानुसार, ७१ टक्के कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला कंपनीच्या कामकाजात कपात करावी लागली. ९ टक्के कार्यकारींनी मात्र कामकाज ५० टक्क्यांनी वाढवावे लागल्याचे सांगितले.

ग्राहकांवरील परिणामाबाबत मतभेदआपल्या उद्योगांत पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेनंतर अधिक चांगली सुधारणा असल्याचे ४६ टक्के उत्तरदात्यांनी सांगितले. २९ टक्के उत्तरदात्यांनी दुसऱ्या लाटेनंतरची सुधारणा पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट असल्याचे नमूद केले.  कोविडचा ग्राहकांवर कसा परिणाम झाला, याबाबत कंपन्यांच्या सीईओंमध्ये मतभेद पाहायला मिळाले. आदल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या काळात मागणी चांगली असल्याचे ४९ टक्के कार्यकारींनी सांगितले. २८ टक्के कार्यकारींनी, मागणी दोन्ही लाटांत सारखीच असल्याचे सांगितले. २३ टक्के कार्यकारींच्या मते दुसऱ्या लाटेच्या वेळी मागणी पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक वाईट राहिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतपैसाव्यवसाय