Shantanu Naidu On Ratan Tata: भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक, शंतनू नायडू यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रतन टाटा हे केवळ त्यांच्या कुशल व्यावसायिक नेतृत्वासाठीच नव्हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण परोपकारी योगदानासाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या नंतरच्या काळात, त्यांचे विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी त्यांच्या जवळच्या संबंधांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर शंतनू यांनी सकाळी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. राजकारणापासून ते खेळापर्यंतच्या मोठ्या व्यक्ती भारताच्या या रत्नाला आदरांजली वाहत आहेत. रतन टाटा यांचे सर्वात जवळचे मित्र आणि त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे शंतनू नायडू यांनीही त्यांच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. लिंक्डइनवरील त्यांच्या पोस्टमध्ये, रतन टाटा यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांनी त्यांच्या घनिष्ठ मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.
"त्यांच्या मैत्रीने माझ्या आत एक पोकळी सोडली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्य घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस," असे ३० वर्षीय शंतनू नायडू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शंतनू यांनी एक थ्रोबॅक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये ते दोघे एकत्र दिसत आहेत.
शंतनु नायडू यांची रतन टाटांसोबतची मैत्री त्यांच्या प्राण्यांबद्दलच्या प्रेमातून फुलली. २०१४ मध्ये दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. नायडू यांनी रात्रीच्या वेळी वाहनांच्या धडकेपासून भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी रिफ्लेक्टिव कॉलर तयार केली होती. याने प्रभावित होऊन रतन टाटांनी नायडूंना त्यांच्यासाठी काम करण्यासाठी बोलवून घेतले. गेल्या १० वर्षात शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू मित्र बनले. गेल्या काही वर्षांमध्ये, क्वचितच कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या रतन टाटांसोबत नायडू सोबत असायचे.
कोण आहेत शंतून नायडू?
वयाच्या २८ व्या वर्षी शंतनू नायडू यांनी व्यवसाय उद्योगात पाऊल ठेवले होते. शंतनू नायडू रतन टाटा यांना स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बिझनेस टिप्स देत होते. शंतनू नायडू यांचा जन्म १९९३ मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला. ते प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, डीजीएम, सोशल मीडिया प्रभावकार, लेखक आणि उद्योजक आहेत. टाटा ट्रस्टचे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून शंतनू नायडू हे देशभरात खूप लोकप्रिय आहेत.