लंडन: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या विद्यापीठानं रतन टाटांचा गौरव केला आहे. ब्रिटन विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर डेम नॅन्सी रोथवेल भारताच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रतन टाटांची भेट घेतली. रोथवेल म्हणाले, रतन टाटा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. तसेच ते मोठे उद्योगपती आणि छोट्या व्यावसायिकांसाठी आदर्श आहेत.
रतन टाटा यांनी 1991मध्ये टाटा उद्योगसमूहाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुपनं नवनवे शिखर पादाक्रांत केले आहेत. ते आज देशातील प्रामाणिक उद्योगपतींमध्ये गणले जातात. रतन टाटा आपल्या पगारापैकी 65 टक्के वाटा दान करतात. वर्षं 2000मध्ये त्यांना भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या नागरी सन्मानानं गौरविण्यात आलं होतं. तसेच 2008ला त्यांना पद्मविभूषणानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...
ओळखलंत का सर मला, रतन टाटांनी फोटो शेअर केलेला तरुण कोण?
...म्हणून टाटांचा केला ब्रिटन विद्यापीठानं सन्मान
प्रत्येक गोष्टीत नावीन्यता आणण्याचा प्रयत्न आणि परोपकाराची भावना लक्षात घेऊन ब्रिटनच्या विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे. टाटा यांच्या नेतृत्वात 1991 ते 2012 या कालावधीत टेटली, देवू, कोरुस, जग्वार आणि लँड रोव्हर या प्रमुख आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे टाटा ग्रुपनं अधिग्रहण केले. त्यामुळे टाटा समूह हा जगातील सर्वात मोठा समूह बनला, असे विद्यापीठानं अधोरेखित केलं आहे.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी असलेल्या रतन टाटा यांनी परोपकारातून अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1982पासून टाटा कुटुंबातील सदस्यांनी ट्रस्ट स्थापन करून या टाटा ग्रुपला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पोषण, स्वच्छता, कर्करोग, दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक उद्योजकता अशा महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी टाटांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
रतन टाटांच्या हाती कंपनीची धुरा आल्यानंतर त्यांनी यशाची मालिका आणि नवे विक्रम करण्यास सुरुवात केली. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणपिढीलाही नवी ऊर्जा मिळाली. टाटांचा आदर्श इतर उद्योगपती घेऊ लागले. मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं हा रतन टाटांचा स्वभावगुण आहे. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती केली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असताना टाटांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. निवृत्तीनंतरही ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत.