Tata Group News : टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात. याचा प्रत्यय नुकताच पाहायला मिळाला. टाटा समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ने अखेर त्या 115 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची नोटीस मागे घेतली आहे. टाटा एज्युकेशन ट्रस्ट (TET) चे अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वतः या यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
रतन टाटा बनले संकटमोचक28 जून 2024 रोजी TISS ने मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी येथील त्यांच्या सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले होते. पण, आता TISS ने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी 55 अध्यापक आणि 60 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कराराचे नूतनीकरण न करण्याची नोटीस मागे घेतली असून, त्यांना त्यांचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. TET कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी देणार आहे.
TISS चे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांची नियुक्ती टाटा ट्रस्टच्या वित्तपुरवठा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पांचा निधी थांबला होता. आम्हाला आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने आम्ही त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ट्रस्टकडून निधी मिळाल्यानंतर आम्ही त्यांची पुन्हा नियुक्ती करू.