Join us

Russia Ukraine War: टाटांचा निर्णय अन् पुतिन यांना जबर धक्का; ‘या’ कंपनीचा रशियातील कारभार गुंडाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 8:38 PM

Russia Ukraine War: रशियासोबत तत्काळ व्यवसाय थांबण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला असल्याचे टाटाच्या कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बंगळुरू: रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्या अद्यापही युद्ध सुरू आहे. या युद्धाला आता जवळपास दोन महिने होत आले. तरीही रशिया किंवा युक्रेन कोणीही माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. या युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जगातील अनेक देशांनी रशियावर तीव्र निर्बंध लादले आहेत. यातच आता दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहातील एक मोठी कंपनी आता रशियातील आपला कारभार गुंडाळणार आहे. टाटांनी घेतलेला हा निर्णय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना जबर धक्का असल्याचे मानले जात आहे. 

भारतातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाने रशियाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. युक्रेनला युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या रशियासोबत व्यवसाय बंद करण्याची घोषणा टाटा स्टीलने केली आहे. टाटा स्टील भारतातीलच नव्हे तर जगातील प्रमुख पोलाद उत्पादकांपैकी एक आहे. रशियात टाटा स्टीलचा एकही कर्मचारी नाही. रशियासोबत तात्काळ व्यवसाय थांबण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला असल्याचे टाटा स्टीलने निवेदनात म्हटले आहे. पोलाद उत्पादनासाठी टाटा स्टील रशियातून कोळसा आयात करत होती.

अमेरिकेसह युरोपीय संघाने रशियावर निर्बंध घातले

रशियाने मागील दोन महिने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईतून मोठे नुकसान केले आहे. युक्रेनमधील लाखो नागरिकांनी देशातून स्थलांतर केले आहे. युक्रेनमधील अनेक शहरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रशियाच्या या कृतीला युरोपीय संघ आणि नाटोकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. अमेरिकेसह युरोपीय संघाने रशियावर निर्बंध घातले आहेत. टाटा स्टीलच्या पूर्वी अनेक भारतीय कंपन्यांनी रशियातून व्यवसाय गुंडाळला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने गेल्याच आठवड्यात रशियातून व्यवसाय गुंडाळला आहे.

दरम्यान, गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून जंग जंग पछाडूनही युक्रेनच्या एकाही शहरावर ताबा मिळवता येऊ न शकलेल्या रशियन सैन्याला मारियुपोल या शहरावर कब्जा मिळवण्यात यश आले आहे. या शहरावर आपल्या शूर सैनिकांनी नियंत्रण मिळवले असल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला असून शहराचा वेढा आणखी घट्ट करण्याचे आदेश त्यांनी सैनिकांना दिले आहेत.  

टॅग्स :टाटारतन टाटायुक्रेन आणि रशिया