Join us  

रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:06 PM

बायका-मुलांसह स्कूटरवर भिजलेल्या मध्यमवर्गीला पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी नॅनो कारचे स्वप्न पाहून प्रत्यक्षात उतरवलं होतं.

Ratan Tata Nano Project : उद्योगपती रतन टाटा यांचे नाव कल्पकता, परोपकार आणि दयाळूपणा या शब्दांसाठी समानार्थी आहे. रतन टाटा यांनी आज या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी सामान्यांसाठी केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. कारण टाटा यांनी सामान्य लोकांना मिठापासून ते कारच्या प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत केली आहे. स्कूटरवरील भारतीय कुटुंब पाहून रतन टाटा यांनी त्यांचा सर्वात प्रेमळ असा नॅना कारचा प्रकल्प उभा केला होता. मात्र रतन टाटा यांनी नॅनोच्या विक्री आणि मार्केटिंगमध्ये टाटा समूहाने अनेक चुका केल्याचं मान्य केलं होतं. परवडणाऱ्या कारऐवजी सर्वात स्वस्त कार म्हणून नॅनोचे ब्रँडिंग करणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे रतन टाटा यांनी सांगितले होते.

टाटा नॅनो ही रतन टाटा यांची ड्रीम कार होती, जी त्यांनी देशातील सर्वसामान्यांसाठी लाँच केली होती. ज्या काळात कार घेणे हे प्रतिष्ठेचे मानलं जात होतं त्या काळात उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा नॅनो ही कार लोकांसाठी अवघ्या एक लाख रुपयांमध्ये लॉन्च केली होती. ज्यामध्ये एक लहान कुटुंब आरामात आणि सुरक्षितपणे जाऊ शकत होते. पण लोकांनी टाटा नॅनोला स्वस्त कार म्हणत नाकारले आणि यामुळे रतन टाटा नाराज झाले. २००८ मध्ये रतन टाटा यांनी टाटा नॅनो ही कार जगासमोर सादर केली. टाटा नॅनो कार २००९ मध्ये लाँच झाली आणि त्यानंतर २०१९ मध्ये नॅनोची विक्री थांबली. रतन टाटांच्या अपेक्षेप्रमाणे नॅनोची विक्री झाली नाही आणि अखेरीस तिचे उत्पादन बंद झाले. टाटा नॅनोचे अपयश हे शेवटच्या क्षणापर्यंत रतन टाटांना दुःख देत राहिलं.

नॅनोच्या मार्केटिंगमध्ये चूक  - रतन टाटा

'नॅनो लोकांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून बनवण्यात आली, पण तसे कधीच झाले नाही. आमच्या डीलरशिपद्वारे ती देशभरात पोहोचायला हवी होती. पण आम्ही अनेक चुका केल्या. या कारला सर्वात परवडणाऱ्या कारऐवजी सर्वात स्वस्त कार म्हणून ब्रँड करणे ही सर्वात मोठी चूक होती. या ब्रँडिंग मोहिमेचा बाजारातील कारवर नकारात्मक परिणाम झाला आणि लोकांना स्वस्त कारचे मालक म्हणून पाहिल जावं हे मान्य नव्हतं. मला वाटते की ही आमची सर्वात मोठी चूक होती, ज्यामुळे कार कामगिरीच्या बाबतीत आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही,"  असे रतन टाटा यांनी म्हटलं होतं. मात्र, या कारचे लाँचिंग अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाल्याचेही टाटांनी सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो प्लांटला ममता बॅनर्जींच्या आधीच्या डाव्या सरकारने परवानगी दिली होती. या परवानगीनुसार बंगालमधील या जमिनीवर टाटा नॅनोच्या उत्पादनासाठी कारखाना उभारला जाणार होता. तेव्हा ममता बॅनर्जी विरोधी पक्षात होत्या आणि या प्रकल्पाला विरोध करत होत्या. यानंतर ममला बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यावर सत्तेवर येताच त्यांनी टाटा समूहाला मोठा धक्का दिला. ममता बॅनर्जी यांनी सिंगूरची ती जमीन १३ हजार शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेनंतर टाटा मोटर्सला आपला नॅनो प्लांट पश्चिम बंगालमधून गुजरातला हलवावा लागला.

रतन टाटा यांनी ३ ऑक्टोबर २००८ रोजी कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत नॅनो कार प्रकल्प सिंगूरहून अन्यत्र हलवणार असल्याची घोषणा केली होती. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. टाटांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातच्या साणंदमध्ये उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी टाटांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर टाटा नॅनो कारखाना ३,३४० ट्रक आणि सुमारे पाचशे कंटेनरमधून सिंगूरहून साणंदला पोहोचला. या कामाला सात महिने लागले. टाटांनी साणंदमध्ये आपला कारखाना उभारला आणि उत्पादन सुरु केले. १० जानेवारी २००८ रोजी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे झालेल्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये रतन टाटा यांनी टाटा नॅनो पहिल्यांदा सर्वांसमोर आणली.

टॅग्स :रतन टाटाटाटापश्चिम बंगालममता बॅनर्जी