Join us  

रतन टाटा... हॅपी लँडिंग कॅप्टन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 9:05 AM

मुंबई विमानतळ हे टाटांचे सतत प्रवासाचे विमानतळ होते. अनेकदा टाटा स्वतः त्यांची आवडती नॅनो कार चालवत चार्टर टर्मिनलला यायचे. महागड्या गाड्या बघायची सवय असलेल्या या ठिकाणी जेव्हा नॅनोमध्ये बसलेले रतन टाटा दिसायचे तेव्हा खजील होऊन सगळेच त्यांच्यासाठी दरवाजा उघडायचे...

मंदार भारदे, विमान वाहतूक व्यावसायिक -

काही वर्षांपूर्वी आम्हाला टाटा ग्रुपमधून फोन आला आणि मुंबईहून कऱ्हाडला जाण्यासाठी टर्बो प्रॉप विमानाची उपलब्धता आहे का, अशी विचारणा झाली. रतन टाटा यांना या विमानाने प्रवास करायचा होता आणि टाटा समूहात असलेल्या मोठ्या विमानांना कऱ्हाडची धावपट्टी छोटी असल्याने वापरता येणार नव्हते. आम्हा सगळ्यांसाठी ही एक मोठी संधी होती. कारण, विमान वाहतूक क्षेत्रातल्या सगळ्यांसाठीच रतन टाटांचे स्थान हे आदरणीय आहे. आमचे फारच कमी क्लायंट हे स्वतः पायलट असतात. त्यामुळे तेंडुलकरला बॉलिंग करायची संधी जर एखाद्या नव्या बॉलरला मिळाली तर त्याला जसे वाटेल तशी काहीशी आमची भावना होती.

टाटा ठरलेल्या वेळेपेक्षा जवळजवळ ४५ मिनिटे लवकर विमानतळावर आले. ताज एअरची स्वतंत्र लाउंज मुंबईला आहे आम्हाला वाटले त्यांचे काही काम असेल म्हणून लवकर आले असतील आणि लाउंजमध्ये जातील आणि ते काम करतील; पण तसे झाले नाही ते थेट विमानापाशी आले आणि दोन्ही पायलटशी गप्पा मारायला लागले. त्या विमानाचे इंजिन, नेव्हिगेशन यंत्रणा या सगळ्याबद्दल त्यांनी नुसते जाणून घेतले नाही तर आमच्या टीमला माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी त्यांनी एखादा चांगला शिक्षक समजावून सांगतो तशा समजावून सांगितल्या आणि जे त्यांना माहीत नव्हते ते एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे जाणूनही घेतले. आमच्या लक्षात आले की एका नव्या प्रकारच्या विमानाने आपल्याला प्रवास करायला मिळतो आहे या उत्सुकतेने ते आवर्जून लवकर आले होते. त्यांनी स्वतः अनेक विमाने विकत घेतली इतकेच नाही तर त्यातली बहुतांश त्यांनी पायलट म्हणून उडवलीसुद्धा तरीही या विमान प्रेमी माणसाची नव्या विमानाबद्दल आणि नव्या पायलटबद्दल एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता अजूनही कायम होती. 

हवामानामुळे आम्हाला टेकऑफची परवानगी मिळायला उशीर होत होता म्हणून आम्ही सर आपण लाउंजमध्ये थांबा, परवानगी मिळाली की आपल्याला बोलवायला येतो, असे सांगितले तर त्यांनी ते नाकारले आणि ‘आय एम मोर कंफर्टेबल नीअर द बर्ड’ असे सांगून तिथेच थांबून गप्पा मारल्या. त्या प्रत्येक क्षणी आम्हाला विमानावर नितांत प्रेम करणाऱ्या एका उमद्या माणसाचे दर्शन झाले. तो सगळा प्रवास त्यांनी आरामदायी खुर्चीवर बसून न करता पायलटच्या मागच्या जरा अडचणीच्या असलेल्या पण जिथून कॉकपीट दिसते, असा खुर्चीवर बसून आणि कानाला एटीसी टॉवरचे संभाषण ऐकता येण्यासाठी हेडफोन लावून केला. मुंबई विमानतळ हे टाटांचे सतत प्रवासाचे विमानतळ होते. त्यामुळे विमानतळावरच्या अनेक लोकांकडे टाटा साहेबांचे अनेक किस्से आहेत. अनेकदा टाटा स्वतः त्यांची आवडती नॅनो कार चालवत विमानतळावर यायचे. या चार्टर टर्मिनलला महागड्या गाड्या बघायची सवय आहे. मग जेव्हा या लहानग्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेले रतन टाटा दिसायचे तेव्हा खजील होऊन सगळेच टाटांसाठी दरवाजा उघडायचे. खूप कमी जणांना हे माहीत असेल की रतन टाटांकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्ही उडवायचे लायसन्स होते आणि ते खूप दुर्मीळ आहे. टाटा साहेबांनी जेव्हा रिटायरमेंट घेतली तेव्हा जाहीरपणे असे सांगितले होते, की मला आता भरपूर फ्लायिंग करायला वेळ मिळेल. खूप वेळेला आपल्या ज्युनिअर स्टाफला मागे बसवून टाटा स्वतः विमान उडवायचे. ते अतिशय कुशल वैमानिक होते. एकदा सेशेल्सहून आपल्या सहकाऱ्यांना मागे बसवून ते एक मोठे विमान उडवून आणत असताना त्यांच्या विमानाचे एक इंजीन नादुरुस्त झाले. त्या वेळेला ते जवळच्या विमानतळापासून सुमारे दीडशे मैल लांब होते. 

बरोबरच्या सगळ्यांनीच जिवंत राहायची आशा सोडून दिली; त्याही वेळेला एका इंजीनवर विमान उडवायचे प्रचंड दडपण असताना रतन टाटांनी नुसते कौशल्याने विमान उडवून सुरक्षित लँड नाही केले तर या सर्व काळ घाबरलेल्या सहकाऱ्यांची चेष्टा करत अत्यंत शांतपणे त्यांना धीर देत विमान उडवले, हे फारच अवघड कसब आहे. एअर इंडिया टाटा ग्रुपकडे राहिली नाही, याचे फार मोठे शल्य जे. आर. डी. टाटा प्रमाणे रतन टाटांनादेखील होते. त्यांच्या अखेरच्या दोन वर्षांत एअर इंडिया पुन्हा टाटा ग्रुपकडे आली, याने त्यांना विलक्षण आनंद झाला होता. भारतीय हवाई उड्डाण क्षेत्र नव्या गतीने भरारी घेत असताना रतन टाटांनी या क्षेत्राच्या विकासाला जी पॅशन दिली आहे त्याबद्दल सगळेच एव्हिएटर त्यांचे कायमचे ऋणी राहतील. हॅपी लँडिंग कॅप्टन रतन टाटा...

टॅग्स :टाटाविमान