Ratan Tata News : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे आज रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं.
रतन टाटा यांचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात विश्वासाची भावना येते. रतन टाटा ही अशी व्यक्ती जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात घर करून आहेत. त्यांचं भारतीय उद्योगक्षेत्रातलं योगदान आणि अनेकांना केलेली मदत ही कधीही विसरता येणारी नाही. ३८०० कोटींचे मालक असलेल्या टाटा यांनी कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात कसं स्थान निर्माण केलं. त्यांना लोकांचा इतका सन्मान का मिळत याबद्दल आज जाणून घेऊ.
भारताच्या विकासात टाटा समूहाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा टाटा समूह नेहमीच देशाच्या पाठीशी उभा राहिला. इंग्रजांचा काळ असो किंवा आता, टाटा समूह नेहमीच लोकांच्या मदतीला उभा राहिला आहे. असाच एक काळ ब्रिटिश राजवटीत आला, जेव्हा मौर्य घराण्याचा आणि त्याची राजधानी पाटलिपुत्राचा इतिहास शोधला जात होता. अचानक इंग्रजांनी हात वर केले तेव्हा टाटा समूहाचे संस्थापक सर जमशेदजी टाटा यांचे धाकटे चिरंजीव सर रतन जमशेदजी टाटा पुढे आले. सर्व जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली आणि आज मौर्य घराण्याचा इतिहास लोकांसमोर आहे.
कर्मचाऱ्याच्या रुपात करिअरची सुरुवात
टाटा समूहाला अनेक उंचीवर नेण्यामागे रतन टाटा यांचं मोठं योगदान आहे. आज टाटा समूहानं देश-विदेशात खूप नाव कमावलंय. रतन टाटांनी टाटा समूहाला जगात नाव दिलं असले तरी ते जमिनीशी जोडलेले राहिले. इतक्या मोठ्या व्यक्तीनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात कर्मचारी म्हणून केली होती.
केली अपार मेहनत
आलिशान घरात वाढलेल्या आणि कॉर्नेल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅममधून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेऊनही रतन टाटा यांनी आयबीएमकडून नोकरीची ऑफर नाकारली. १९६२ मध्ये त्यांनी टेल्कोच्या (आता टाटा मोटर्स) दुकानाच्या मजल्यावर काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी ते एका ब्लास्ट फर्नेस टीमचे सदस्य होते.
वयाच्या २१ वर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष
रतन टाटा यांना वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात 'लिस्टेड' झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.