Join us  

Ratan Tata: गोष्ट एका स्टार्टअपची... अन् मराठमोळ्या आदितीला रतन टाटांचा फोन आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 12:04 PM

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी हे स्टार्टअप सुरू केले

पुणे/मुंबई- पुणे येथील मोबाइल एनर्जी डिस्ट्रीब्यूशन स्टार्टअप रेपोस एनर्जी (Repos Energy) च्या संस्थापकाने संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना उद्योगपती रतना टाटा यांचा एक किस्सा सांगितला. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या एका फोन कॉलमुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं. विशेष म्हणजे टाटा ग्रुपने या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. नुकतेच, रेपोस एनर्जीने ऑर्गेनिक कचऱ्यांपासून बनवलेली एक ‘मोबाइल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हीकल’ लॉन्च केली आहे. 

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी हे स्टार्टअप सुरू केले. मात्र, हे स्टार्टअप गतीमान करण्यासाठी एका मेंटरची आवश्यकता त्यांना वाटत होती. ज्या मेंटरला या क्षेत्राचा तगडा अनुभव आहे, त्यांना भेटायचं या वाळुंज कंपनीने ठरवले. त्यावेळी, रतन टाटा यांचं नाव त्यांच्यासमोर आलं. मात्र, रतन टाटा हे काही आपले शेजारी नाहीत, त्यामुळे लगेचच त्यांची भेट मिळेल. त्यात अनेकांनी सांगितलं की, रतन टाटांची भेट अशक्य आहे. मात्र, आदितीने आशा सोडली नाही, रतन टाटांना भेटायचा चंगच तिने बांधला होता. 

आदिताने एक 3 ड्री पेझेंटेशन तयार करुन रतन टाटा यांना पाठवले. त्यामध्ये, रेपोस एनर्जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशाप्रकारे कुठल्याही इंधन किंवा एनर्जीद्वारे डिस्ट्रीब्युशन आणि डिलिव्हरीला बदलू इच्छित आहे. त्याशिवाय, काही व्यक्तींच्या मदतीने रतन टाटा यांना भेटण्यासाठी पाठपुरवाही केला होता. विशेष म्हणजे रतन टाटा यांच्या घराबाहेर तब्बल 12 तास वाटही पाहिली होती. मात्र, भेट न झाल्याने हताश होऊन दोघेही हॉटेलवर परतले होते. त्याचवेळी, एक फोन आला.. क्या मै आदिती से बात कर सकता हूँ... तेव्हा आदितीने आपण कोण बोलत आहात, असा प्रश्न केला. त्यावर, मै रतन टाटा बोल रहा हूँ, मुझे तुम्हारा लेटर मिला. क्या हम मिल सकते है... अशी वाक्य आदितीच्या कानावर पडली अन् तिचा आनंद गगनात मावेना. डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी 10.45 वाजता आम्ही रतन टाटा यांच्या घरी पोहोचलो, अशी आठवण आदितीने सांगितली आहे.

सकाळी शार्प 11 वाजता निळा शर्ट परिधान केलेली एक उंच आणि गोरीपान व्यक्ती आमच्यासमोर आली ती म्हणजे रतन टाटा. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही रतन टाटा यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर, आदितीच्या विनंतीवरुन टाटा मोटर्सने 2019 मध्ये रेपोस एनर्जीमध्ये गुंतवणूक केली. तर, 2022 मध्ये या गुंतवणुकीचा दुसरा टप्पाही जोडला. त्यामुळे, टाटा मोटर्सशिवाय रेपोस एनर्जीची यशस्वी घोडदौड शक्यच नव्हती, असे आदितीने म्हटले आहे.    

टॅग्स :रतन टाटापुणेव्यवसाय