Ratan Tata News : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांनी प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रतन टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या तब्येतीबाबतही अनेक बातम्या आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी सोमवारी रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आरोग्याविषयीच्या अफवांचं खंडन केलं होतं. पाहूया काय होती त्यांची अखेरची पोस्ट.
"माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या तब्येतीबद्दल नुकत्याच पसरत असलेल्या अफवांची मला माहिती आहे आणि मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. सध्या माझं वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे," असं त्यांनी आपल्या अखेरच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
काय म्हटलं टाटा समूहानं?
दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर मिळालेल्या प्रेम आणि सहानुभूतीबद्दल टाटा कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. "आम्ही, त्यांचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, ज्यांनी त्यांचं कौतुक केलं त्यांच्याकडून अपार स्नेहानं सांत्वन स्विकारतो. ते यापुढे आपल्यात नसले तरी त्यांची नम्रता, औदार्य आणि हेतूचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील," असं टाटा समूहानं म्हटलं.