Join us

रतन टाटा 'या' श्वानाचे मालक शोधताहेत, रात्री रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडला; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 9:27 AM

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी या हरवलेल्या श्वानाचा फोटो शेअर करत या सोबत एक पोस्ट लिहिली आहे.

देशातील सर्वात मोठ्या उद्योगपती समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा नेहमी चर्चेत असतात. टाटा यांनी अनेक क्षेत्रात मोठं काम केलं आहे, रतन टाटा यांनी श्वान प्रेमी आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून श्वानांची काळजी घेण्याचे आवाहन केलं होतं. आता पुन्हा एकदा टाटा चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे त्यांनी रात्री उशीरा इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. यात त्यांनी एक श्वानाचा फोटो पोस्ट केला आहे. ते श्वानाच्या मालकाचा शोध घेत आहेत. 

रतन टाटा यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पट्टा घातलेल्या कुत्र्याचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत दिसणारा हा कुत्रा प्रत्यक्षात बेपत्ता असून रतन टाटा यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वाटेत भटकताना सापडला. रस्ता चुकून मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या या कुत्र्याची सध्या रतन टाटा यांच्या कार्यालयात काळजी घेतली जात असून त्याच्या मालकाचा शोधही सुरू आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी या हरवलेल्या कुत्र्याचा फोटो शेअर करताना त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या ऑफिसमध्ये हरवलेला कुत्रा सापडला आहे. काल रात्री सायन हॉस्पिटलमधून माझ्या ऑफिसमध्ये आणले होते. जर तुमच्याकडे त्याच्या मालकाचे काही तपशील असतील तर कृपया ते reportlostdog@gmail.com वर मेल करा. सध्या तो आमच्या देखरेखीखाली आहे आणि आम्ही त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहोत.

अब्जाधीश उद्योगपती रतन टाटा यांना कुत्र्यांची खूप आवड आहे आणि हे सर्वश्रुत आहे. एवढेच नाही तर ते प्राण्यांची विशेषत: भटक्या कुत्र्यांची खूप काळजी घेतात. अनेक एनजीओ आणि अ‍ॅनिमल शेल्टर्सनाही ते देणगी देत ​​असतात. रतन टाटा यांच्या घरी जो कुत्रा आहे, तो त्यांना गोव्यात रस्त्यावर फिरताना मिळाला होता. आज तो कुत्रा त्यांच्या घरी असतो.   

टॅग्स :रतन टाटाटाटा