Join us  

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 1:59 PM

Ratan Tata Story: लॉस अँजेलिसहून शिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या व्यक्तीला १५ दिवसांतच लोखंडाच्या तापलेल्या भट्टीवर कामाला लावण्यात आले...

रतन टाटा यांनी परदेशातून शिक्षण घेऊन येत एकदम कंपनीच्या बड्या पदावर काम केलेले नाहीय. त्यांनी टेल्कोच्या लोखंड वितळविण्याच्या भट्टीवरही काम केलेले आहे. जवळपास सर्व विभागांमध्ये काम करून त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर रतन टाटांना बड्या पदांवर जबाबदारी देण्यात आली होती. या काळात जेआरडी टाटांनी रतन टाटांना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. रतन टाटांच्या उमेदीचा तो काळ होता, दिसायला देखणा असा अँग्री यंग मॅन त्यांच्यात होता. एक वेळ अशी आलेली की जर त्यांनी त्यांच्या मनातील विद्रोहाच्या भावनेवर ताबा ठेवला नसता तर कदाचित आज जगविख्यात उद्योगपतीपर्यंतची उंची त्यांना गाठता आली नसती. 

खुद्द रतन टाटांनीच तो प्रसंग एका मुलाखतीवेळी सांगितला आहे. रतन टाटा लॉस अँजेलिसहून शिक्षण घेऊन मुंबईत परतले होते. यानंतर लगेचच म्हणजे १५ दिवसांतच त्यांना लोखंडाच्या तापलेल्या भट्टीवर कामाला लावण्यात आले. अमेरिकेत आर्किटेक्ट झालेला एक तरुण जमशेदपूरच्या फॅक्टरीत कामाला लावण्यात आला होता. तेथील कर्मचारी, अधिकारी यांना जेआरडींनी तंबीच देऊन ठेवली होती. रतन टाटांना कोणताही स्पेशल ट्रीटमेंट नको. रतन टाटा मुंबईहून जमशेदपूरला कारने जाणार होते, तिथेही कार वापरणार होते. परंतू, ती कारही त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. 

कारऐवजी जमशेदपूरमध्ये फिरण्यासाठी सायकल वापर अशा सक्त सूचना जेआरडींनी केल्या. या बंधनांना झुगारून देण्याचे विचार रतन टाटांच्या मनात येत होते. रतन टाटांना हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगण्यात आले. ''एका अशा व्यक्तीच्या नजरेतून पहायचे झाले जो लॉस अँजेलिसहून आला होता, त्याला कार घेऊन जमशेदपूरला जाऊ शकत नाही, सायकल वापर असे सांगितले गेले होते. माझ्या मनात विद्रोहाची भावना तयार झाली होती, मी त्यातून जमशेदपूरमध्ये चालतच फिरू लागलो होतो'', असे टाटा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. 

मी अनेकदा मुंबईला परतण्याचा विचार केला होता, असेही रतन टाटा म्हणाले होते. परंतू, परिस्थिती अशी बनत गेली की मी तिथे काम करत गेलो. टेल्को, टिस्कोच्या सर्व विभागांत काम केले. काम समजून घेतले याचा मला फायदा झाल्याचे टाटांनी कबुल केले होते. जर रतन टाटांनी या बंधनांना कंटाळून जमशेदपूर सोडले असते तर कदाचित आज ते टाटा समुहाचे सर्वेसर्वा बनू शकले नसते. 

टाटा ग्रुपची जबाबदारी कशी मिळाली...रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९९० मध्ये जेआरडी टाटांनाही याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी रतन टाटा आणि जेआरडी हे दोघेही जमशेदपूरला होते. रतन टाटांना मर्सिडीजबरोबर वाटाघाटी करण्यासाठी जर्मनीला पाठविण्यात आले. तिथून परतले तेव्हा जेआरडी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते, असे रतन टाटांना समजले. तेव्हा जेआरडींचे वय ८७ वर्षे होते. त्यांनी डिस्चार्ज घेतल्यावर रतन टाटांना माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी नवीन आहे, असे म्हटले. ''मला जमशेदपूरमध्ये जे झाले त्यामुळे मला एक निर्णय घेण्याचे कारण मिळाले आहे. मला आता टाटा ग्रुपचे अध्यक्षपद सोडायला हवे. मी निर्णय घेतला आहे आता तूच माझी जागा घ्यावीस'', असे म्हणत जेआरडींनी रतन टाटांना अध्यक्ष केले होते. 

टॅग्स :रतन टाटाटाटा