रतन टाटा हे नाव माहित नसेल अशी कोणीही व्यक्ती नसेल. हे नाव ऐकताच एक नम्र, आणि हसतमुख चेहरा समोर येतो. रतन टाटा हे भारतातील सर्वात लोकप्रिय उद्योगपतींपैकी एक आहेत. रतन टाटांचे चाहते तुम्हाला देशभरात पाहायला मिळतील. टाटा समूहाचे हे माजी अध्यक्ष त्यांचे ज्ञान, दानशूरपणासाठी ओळखले जातात. आपल्या वडिलांचा वारसा त्यांनी पुढे नेला आहे. रतन टाटा यांचे चाहते त्यांना अनेक भेटवस्तू देत असतात. त्यांचे चाहतेही कलेच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना दिसतात. आंतरराष्ट्रीय कलाकार असीम पोद्दार हे रतन टाटांचे असेच एक चाहते आहेत. पोद्दार हा जमशेदपूरमधील मानगो येथील रहिवासी आहे.
पेटिंग पाहून भावूक
पोद्दार यांनी रतन टाटांचं अशी पेंटिंग तयार केलं की ते पाहून टाटा भावूक झाले. यामध्ये रतन टाटा त्यांचे पूर्वज जमशेदजी टाटा यांना पुष्पहार घालताना दिसत आहेत. जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची सुरुवात केली. पोद्दार यांच्या पेंटिंगचा फोटो वेगाने व्हायरल झालाय.
पोद्दार यांना घरी बोलावलं
रतन टाटा यांनी चित्रकार असीम पोद्दार यांचं कौतुक केलं. हे पेंटिंग घेऊन टाटांनी पोद्दार यांना त्यांच्या घरी बोलावलं. जमशेदपूरमध्ये प्रतिभेची कमतरता नसल्याचं टाटा यावेळी म्हणाले. रतन टाटा यांना भेटणं आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करणे हे आपलं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झाले आहे, असं असीम पोद्दार म्हणाले. रतन टाटा यांच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आदर यासाठी आपण सदैव ऋणी राहणार असल्याचंही ते म्हणाले.