Ratan Tata News : देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे (Tata Group) अनेक वर्षे नेतृत्व करणारे रतन टाटा यांचं नुकतेच निधन झालं. त्यांनी जवळपास १० हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली आहे. आपल्या इच्छापत्राच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांनी चार जणांवर सोपवली. आपल्या इच्छापत्रात त्यांनी आपल्या जर्मन शेफर्ड श्वान टिटोची 'अमर्याद' काळजी घेण्याची तरतूद केली आहे. एखाद्या उद्योगपतीने आपल्या इच्छापत्रात अशी तरतूद करण्याची भारतातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
रतन टाटा यांनी आपलं फाऊंडेशन, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय, घरातील कर्मचारी आणि इतरांनाही आपल्या संपत्तीत वाटा दिला आहे. टाटांच्या मालमत्तेत अलिबागमधील दोन हजार चौरस फुटांचा बंगला, जुहू, मुंबईतील दोन मजली घर, ३५० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समधील ०.८३ टक्के हिस्स्याचा समावेश आहे.
पाच-सहा वर्षांपूर्वी रतन टाटांनी टीटोला दत्तक घेतलं होतं. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी आपला आचारी राजन शॉ यांच्यावर सोपवली आहे. तीन दशकांपर्यंत रतन टाटांच्या सोबत असलेले त्यांचे बटलर सुब्बय्या यांच्यासाठीही या इच्छापत्रात तरतूद करण्यात आली आहे. रतन टाटा यांनी शॉ आणि सुब्बय्या यांच्यासाठी आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान डिझायनर कपडे खरेदी केले होते, असं म्हटलं जातं.
शांतनू नायडूंना काय मिळालं?
रतन टाटा यांचे कार्यकारी सहाय्यक शांतनू नायडू यांचंही नाव इच्छापत्रात आहे. नायडू यांच्या गुडफेलो या उपक्रमातील आपला हिस्सा टाटांनी सोडला आहे. परदेशात शिक्षणासाठी घेतलेलं नायडू यांचे वैयक्तिक कर्जही त्यांनी माफ केलंय. टाटा समूहात चॅरिटेबल ट्रस्टचे शेअर्स सोडण्याची परंपरा आहे. रतन टाटा यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यांचा हिस्सा रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशनला (RTEF) हस्तांतरित करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन आरटीईएफचे अध्यक्ष होऊ शकतात.
अलिबागच्या घराबबात स्पष्टता नाही
रतन टाटा कुलाब्यातील हेलकाई हाऊसमध्ये राहत होते. याची मालकी टाटा सन्सची १०० टक्के उपकंपनी असेलेल्या एव्हर्ट इन्व्हेस्टमेंट्सकडे आहे. त्याचं भवितव्य एव्हर्ट ठरवणार आहे. हेलकाई हाऊस आणि अलिबाग बंगल्याची रचना रतन टाटा यांनी केली होती. अलिबागच्या मालमत्तेबाबत मात्र अद्याप ही बाब स्पष्ट झालेली नाही. जुहू हाऊस सव्वा एकरात पसरलेलं आहे. हा वारसा रतन टाटा आणि त्यांच्या कुटुंबाला मिळाला होता. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून ते बंद असून आता ते विकण्याची योजना असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
गाड्यांचा ताफा कोणाला मिळणार
टाटा सन्सच्या शेअर्सव्यतिरिक्त टाटा समूहातील इतर कंपन्यांमधील रतन टाटा यांचा हिस्सादेखील आरटीईएफकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या कंपनीची स्थापन २०२२ मध्ये करण्यात आलीये. या कंपनीनं २०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओपूर्वी टाटा मोटर्सकडून टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १४७ कोटी रुपयांना विकत घेऊन कंपनीनं पहिली इक्विटी गुंतवणूक केली. त्यानंतर टाटा डिजिटलमधील अल्प हिस्सा खरेदी केला.
रतन टाटा यांनी आरएनटी असोसिएट्स आणि आरएनटी अॅडव्हायझर्सच्या माध्यमातून गुंतवणूक केली. ही गुंतवणूक विकली जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम आरटीईएफला दिली जाईल. रतन टाटांच्या ताफ्यात सुमारे २०-३० वाहनं होती. यात अनेक लक्झरी मॉडेल्सचाही समावेश आहे. ही वाहनं कुलाब्यातील हेल्काई हाऊस आणि ताज वेलिंग्टन म्युज सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आली आहेत. या संग्रहाचा अद्यापही विचार सुरू आहे.