किड्सवेअर स्टार्टअप फर्स्टक्रायचा (FirstCry IPO) ४,१९४ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ऑगस्टरोजी खुला होणार आहे. सॉफ्टबँक आणि प्रेमजी इन्व्हेस्ट यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीनं इश्यू प्राइस ४४० ते ४६५ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. दिगग्ज उद्योजक रतन टाटा यांची या इश्यूमधून बरीच कमाई होणार आहे. कंपनीतील गुंतवणुकीवर त्यांना ४४८.९ टक्के मल्टीबॅगर परतावा म्हणजेच २.९६ कोटी रुपयांचा भरघोस नफा मिळणार आहे.
८६ वर्षीय टाटा यांनी २०१६ मध्ये फर्स्टक्रायमधील ०.०२% हिस्सा सुमारे ६६ लाख रुपयांना खरेदी केला होता आणि आता ४६५ रुपयांच्या अपर बँडवर त्यांना सुमारे ३.६२ कोटी रुपये मिळतील. टाटा या इश्यूच्या माध्यमातून कंपनीतील आपले सर्व ७७,९०० शेअर्स विकणार आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, फर्स्टक्रायमध्ये टाटांच्या अधिग्रहणाची सरासरी किंमत ८४.७२ रुपये प्रति शेअर आहे.
रतन टाटा हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते आणि आता ते टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आहेत. आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट, डिजिटल पेमेंट ब्रँड पेटीएम, इलेक्ट्रिक वाहन निर्माता स्टार्टअप ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अपस्टोक्स सारख्या अनेक स्टार्टअप कंपन्यांसाठी त्यांनी एंजेल इनव्हेस्टर म्हणून काम केलं आहे.
फर्स्टक्रायमधील गुंतवणुकीचा फायदा रतन टाटा यांना होणार आहे. पण गेल्या वर्षी गुंतवणूक करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इतर अनेक गुंतवणूकदारांना याचा फटका बसणार आहे. सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४८७.४४ रुपये प्रति शेअर या दरानं या युनिकॉर्नमधील २,०५,१५३ शेअर्स खरेदी केले होते.
सचिन तेंडुलकरला नुकसान
या जोडप्याने फर्स्टक्रायमध्ये १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु आता त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य सुमारे ९.५ कोटी रुपये असेल. अशा प्रकारे त्यांचं सुमारे ५ टक्क्यांचं नुकसान झालं आहे. तथापि, लिस्टिंगनंतर शेअरच्या किंमतीत चढ-उतार होऊ शकतात. फर्स्टक्रायच्या आयपीओमध्ये १,६६६ कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी केले जातील, तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि सॉफ्टबँक सारखे विद्यमान भागधारक ५.४ कोटी शेअर्सची विक्री करतील. त्यासाठी ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत बोली लावता येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल १५ टक्क्यांनी वाढून ६,४८१ कोटी रुपये झाला आहे. याच कालावधीत त्याचा तोटा ३४ टक्क्यांनी कमी होऊन ३२१ कोटी रुपये झालाय.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)