Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...अन् रतन टाटांनी जिंकली इन्स्टाग्रामवरच्या चाहत्यांची मने

...अन् रतन टाटांनी जिंकली इन्स्टाग्रामवरच्या चाहत्यांची मने

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 08:23 AM2020-02-12T08:23:23+5:302020-02-12T10:18:35+5:30

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय झाले आहेत.

Ratan Tata's Response Called "Chhotu" Is Winning Instagram | ...अन् रतन टाटांनी जिंकली इन्स्टाग्रामवरच्या चाहत्यांची मने

...अन् रतन टाटांनी जिंकली इन्स्टाग्रामवरच्या चाहत्यांची मने

नवी दिल्लीः टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय झाले आहेत. ट्विटर, फेसबुकपाठोपाठ आता ते इन्स्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करत असतात. 82 वर्षांच्या रतन टाटांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं. बघता बघता इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोवर्सच्या आकड्याचा टप्पाही 10 लाखांच्या पार गेला आहे. आनंदाच्या भरात इन्स्टाग्रामवरील चाहत्यांसाठी त्यांनी एक पोस्ट केली. इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये स्वतःचा फोटो शेअर्स करत ते लिहितात, मी नुकतेच पाहिले आहे की इन्स्टाग्रामवरील लोकांची संख्या लाखोंच्या घरात गेली असून, माझ्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरला आहे.

हा एक अद्भुत ऑनलाइन परिवार आहे, ज्याचा मी इन्स्टाग्रामवर खातं उघडण्यापूर्वी विचारही केलेला नव्हता. त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच लोकांचा आभारी आहे. माझा असा विश्वास आहे की इंटरनेटच्या या युगात आपण दिलेला प्रतिसाद हा कोणत्याही इतर संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. आपल्या समुदायाचा एक भाग बनणे आणि आपल्याकडून शिकणे खरोखर रोमांचक आहे. मला या गोष्टी खूप आनंदित करतात आणि आशा आहे की एकत्र आपला प्रवास चालू राहील. पाहता पाहताच रतन टाटांची ही पोस्ट 3 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केली आहे. तसेच अनेकांनी त्या पोस्टवर कमेंटही केल्या आहेत. एका युजर्सनं रतन टाटांचं अभिनंदन करताना उपरोधिक भाषेत "छोटू" असा उल्लेख केल्यानं तिला अनेकांनी ट्रोल केलं.

"अभिनंदन छोटू," असं इन्स्टाग्राम एका युजर्सनं रतन टाटांना उद्देशून लिहिल्यानं अनादर करणारी आणि लज्जास्पद भाषा वापरल्याची टिप्पणी करत अनेकांनी तिच्यावर इन्स्टाग्रामवरून हल्ला चढवला. त्यानंतर तिनं "छोटू" या शब्दाचा वापर प्रेमापोटी केल्याचा खुलासा केला. "ते प्रत्येकासाठी एक आदर्श असून, प्रेमातून मी त्यांना काहीही बोलू शकते," असं म्हणत तिनं आपला बचाव केला. तिला इन्स्टाग्रामवर ट्रोल केलं जात असतानाच स्वतः रतन टाटा तिच्या मदतीला धावून आले. "आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. कृपया या तरुणीस सन्मानपूर्वक वागणूक द्या," असं म्हणत शेवटी त्यांनी हसऱ्या चेहऱ्याचं स्माइली टाकलं. रतन टाटांच्या या कमेंटलाच 4 हजार लाइक्स आले आहेत. तुम्ही खरोखरंच ग्रेट आहात सर, असंही एका व्यक्तीनं लिहिलं आहे. रतन टाटांच्या या कृतीचं सर्वच स्तरांतून कौतुक केलं जात आहे. 

Web Title: Ratan Tata's Response Called "Chhotu" Is Winning Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.