Join us  

मान्सून ठरवेल व्याजदराची दिशा

By admin | Published: June 06, 2016 2:21 AM

नव्या आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक धोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्याची कपात केल्यानंतर, मंगळवारी सादर होणाऱ्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात

मुंबई : नव्या आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक धोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्याची कपात केल्यानंतर, मंगळवारी सादर होणाऱ्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कोणतेही बदल न होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच, अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी आता रिझर्व्ह बँकेलाही दमदार मान्सूनची आस लागली असून, व्याजदर कपातीचा आगामी प्रवास मान्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात महागाईने पुन्हा काही प्रमाणात डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. अर्थात, गेल्या आर्थिक वर्षातही महागाई कायम असली तरी त्यामध्ये एक प्रकारचे स्थैर्य होते. परंतु, एप्रिल २०१६च्या महिन्यापासून महागाईच्या आकड्यात आणि किरकोळ बाजारातही झालेल्या दरवाढीतून महागाई वाढताना दिसत आहे. परिणामी, त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक त्यावर तोडगा काढण्यास प्राधान्य देईल. याचसोबत दुसरा मुद्दा म्हणजे, सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढताना दिसत आहेत. जानेवारी २०१६मधील प्रति बॅरल २७ अमेरिकी डॉलरच्या नीचांकानंतर आता याच किमती प्रति बॅरल ५० डॉलरच्या घरात पोहोचल्या आहेत. तेल बाजारातील अभ्यासकांच्या मते तेलाच्या बाजारातील ओहोटीचा कालावधी संपत आला असून, पुढील काळात पुन्हा या भावांमध्ये तेजी दिसेल.मंगळवारी सादर होणाऱ्या पतधोरणामध्ये मान्सून हा सर्वांत कळीचा मुद्दा असेल. भारतीय हवामान खात्याने यंदाच्या वर्षी सरासरीच्या १०६ टक्के अर्थात देशभरात उत्तम पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले आहे. त्यातच गेल्या चार वर्षांपासून कमी पावसास कारणीभूत अशा ‘अल्-निनो’ या घटकाचा प्रभाव कमी झाल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केल्याने दमदार पावसाच्या वाटेतले अडथळे ओसरले आहेत. त्यामुळे जर पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला तर त्याचा निश्चित परिणाम अर्थकारणाचा वेग वाढण्यासाठी होईल आणि त्यामुळेच पुढील पतधोरणावेळी दर कपातीला अधिक वाव मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता जरी दर कपात झाली नाही, तरी दसरा-दिवाळीच्या वेळी (मान्सूनचे सर्व चित्र व प्रभाव तोवर स्पष्ट होईल) रिझर्व्ह बँक गेल्या वर्षीप्रमाणेच दर कपातीचा मोठा बोनस देऊ शकते, असेही मत जाणकार व्यक्त करीत आहेत.दर कपातीचा लाभ ग्राहकांना द्या : जानेवारी २०१५पासून रिझर्व्ह बँकेने आजवर व्याजदरात दीड टक्का कपात करून देशातील १४० बँकांपैकी जेमतेम ६० बँकांनी आजवर कर्जावरील व्याजदराच्या कपातीचा लाभ ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. मात्र, बचतीवरील व्याजदरात सर्वच बँकांनी तातडीने कपात केली आहे. यामुळे गेल्या वर्षी राजन यांनीदेखील दर कपात करण्याचे कडक निर्देश बँकांना दिले होते. यंदा जरी दर कपात झाली नाही तरी राजन यावर नेमके काय भाष्य करतात याकडे बँकांचे लक्ष लागलेले आहे. जानेवारी २०१५पासून आतापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात दीड टक्का कपात केली आहे. आटोक्यात आलेली चलनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण व परिणामी चालू खात्यातील आटोक्यात आलेली वित्तीय तूट आणि अर्थव्यवस्थेच्या नाडीत होणारी सुधारणा पाहता २०१६च्या वर्षात व्याजदरात किमान अर्धा टक्का दर कपातीस वाव असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राजन यांच्या भवितव्याकडेही लक्ष : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६मध्ये अर्थात तीन महिन्यांनी संपत आहे. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राजन यांच्यावर उडवलेली आरोपांची राळ आणि पाठोपाठ स्वत: मोदी यांनी राजन यांची केलेली पाठराखण अशा वादळात राजन यांना दुसरी टर्म मिळते का हादेखील बाजाराच्या औत्सुक्याचा मुद्दा आहे.