Raymond Share Price: टेक्सटाईल कंपनी रेमंडच्या शेअरमध्ये ५ जुलैच्या सुरुवातीच्या व्यवहारात १८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यानंतर कंपनीच्या शेअरनं नवा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीच्या संचालक मंडळानं रिअल इस्टेट व्यवसाय 'रेमंड रियल्टी'च्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. विलीनीकरणाचा उद्देश समूहाचा संपूर्ण रिअल इस्टेट व्यवसाय एकाच संस्थेत एकत्रित करणं, वाढीच्या संधींचा लाभ घेणे आणि नवीन गुंतवणूकदार, तसंच धोरणात्मक भागीदारांना आकर्षित करणं हा असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.
रेमंडचा शेअर ५ जुलै रोजी सकाळी ३०३५.९५ रुपयांवर उघडला आणि त्यानंतर १८ टक्क्यांनी वधारून ३४८४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप २३००० कोटी रुपये आहे. शेअरचा अपर प्राईज बँड ३,५३०.२५ रुपये आणि लोअर प्राइस बँड २,३५३.५५ रुपये आहे. तसंच या शेअरचं सर्किट लिमिट २० टक्के आहे.
विलिनीकरणानंतर विभागणी कशी होणार?
विलिनीकरण योजनेअंतर्गत रेमंड रेमंड रियल्टीचे ६.६५ कोटी शेअर्स जारी करेल ज्याची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअर असेल. रेमंडच्या भागधारकांना कंपनीच्या प्रत्येक शेअरमागे रेमंड रियल्टीचा एक शेअर मिळेल. विलिनीकरण पूर्ण झाल्यानंतर रेमंड रियल्टीला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बीएसई या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र संस्था म्हणून लिस्ट केलं जाईल.
गेल्या वर्षी रेमंडनं आपला लाइफस्टाइल बिझनेस रेमंड कन्झ्युमर केअर म्हणून बदलला होता. कर्जमुक्त होण्याचा कंपनीचा हा प्रयत्न होता. लाइफस्टाइल बिझनेसमध्ये सूटिंग बिझनेससह मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, बी २ सी शर्टिंग, ब्रँडेड कपडे आणि गारमेंटिंग बिझनेस आणि बी २ बी टर्म्स असलेल्या उपकंपन्यांचा समावेश आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)