भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नुकतेच एटीएम ट्रान्झेक्शनवर (ATM Transaction fee) आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फायनान्शिअल ट्रान्झेक्शनवर इंटरचेंज फी ही 15 रुपयांवरून वाढवून 17 रुपये करण्यात आली आहे. तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झेक्शनवर फीमध्ये वाढ करून पाच रुपयांवरून सहा रुपये करण्यात आली आहे. हे नवे दर 1 ऑगस्ट, 2021 पासून लागू होणार आहेत. (Withdrawing cash from ATM? It will cost you more from August 1)
रिझर्व बँकेनुसार इंटरचेंज शुल्क हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट प्रोसेस करण्यासाठी बँका मर्चंटकडून आकारतात. आरबीआयने सांगितले की, ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा निशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्झेक्शन येते. एवढेच नाही तर ग्राहक अन्य बँकेच्या एटीएमद्वारे देखील विनाशुल्क पैसे काढू शकतात. मेट्रो शहरांत तीन आणि नॉन मेट्रो शहरांत पाच मोफत ट्रान्झेक्शन करता येतात.
ATM Transaction fee hike: एटीएम ट्रान्झेक्शन जर या निशुल्क पेक्षा जास्त वेळा झाले तर त्याच्या शुल्कामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. सध्या हे शुल्क 20 रुपये आहे. ते 21 रुपये होणार आहे. या सेवेसाठी येणारा खर्च वाढल्याने हे शुल्क वाढविण्यात येत आहे. यामुळे कस्टमर चार्ज वाढून 21 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
आर्थिक व्यवहारांमध्ये पैसे काढण्याचा समावेश होतो. तर बिगर आर्थिक व्यवहारांमध्ये बॅलेन्स पाहणं, पिन नंबर बदलणं अशा बाबी समाविष्ट आहेत. यापुढे बँकांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांना जास्त शुल्क मोजावं लागेल.