नवी दिल्ली – अनेकदा आपण डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करत असताना ते अयशस्वी होतं, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव अथवा इतर कोणत्याही कारणांनी ते पेमेंट पूर्ण होत नाही. पण आता तुमच्यासाठी नवा पर्याय समोर येत आहे. लवकरच कार्ड आणि मोबाईलच्या माध्यमातूनही तुम्ही ऑफलाईन पेमेंट करु शकता.
आरबीआयनं प्रायोगिक तत्वावर सुरक्षितरित्या कमी रक्कमेच्या पेमेंटसाठी ऑफलाईन सेवेला परवागी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या योजनेतंर्गत अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीएसओ), बँका आणि नॉन बँका कार्ड, वॉलेट्स आणि मोबाईलचा वापर करत ऑफलाईन पेमेंट सेवा देण्यास सक्षम असतील.
ही योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे.
मोबाईल फोन, कार्ड, वॉलेट इ. वापर करुन डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, विशेषत: दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने अडचण होते त्यामुळे अशाप्रकारे ऑफलाईन पेमेंट सुविधा देण्याची योजना आणली आहे.
कसं काम करणार?
ऑफलाइन मोडमध्ये कार्डचा वापर करुन त्याचा डेटा आणि व्यवहारांचा तपशील संग्रहित केला जाईल, त्यासोबत व्यवहाराची पावतीदेखील मिळेल. त्यानंतर जेव्हा इंटरनेट कनेक्शन सुरु होईल तेव्हा पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही संग्रहित केलेला डेटा पेमेंटसाठी वापरला जाईल.
या ऑफलाइन पेमेंटसाठी कार्ड, वॉलेट आणि मोबाईलवर हा पर्याय देणे अपेक्षित आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून अशाप्रकारे ऑफलाइन पेमेंट सुविधा देण्यात आलेली आहे.
या पर्यायाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना काही अटीशर्थीचं पालन करावं लागेल.
- पेमेंट करताना कार्डस, वॉलेट्स किंवा मोबाईलचा वापर करुन किंवा अन्य पर्यायाद्वारे पेमेंट करु शकतील.
- रिमोट किंवा प्रॉक्सिमिटी मोडमध्ये पेमेंट करु शकतात
- या पेमेंट व्यवहारासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त परवानगीची गरज नाही.
- या योजनेत मर्यादा २०० रुपयांवरील व्यवहारांसाठी असेल
- ऑफलाइन व्यवहारांसाठी जास्तीत जास्त २ हजारापर्यंत मर्यादा असेल.