मुंबई: पीएमसी बँकेवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आरबीआयनं बँकेमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. आरबीआयनं प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकानुसार, पीएमसीचे ग्राहक ४० हजार रुपये काढू शकतील. सध्या ही मर्यादा २५ हजार रुपये आहे. आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं आरबीआयनं पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची नुकतीच भेट घेतली होती. ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची विनंती सीतारामन यांनी दास यांना केली होती. पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात येईल, असं आश्वासन दास यांनी बैठकीत दिलं होतं. यानंतर रिझर्व्ह बँकेनं पैसे काढण्याची मर्यादा वाढवत ग्राहकांना दिलासा दिला.