मुंबई : येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आखलेल्या योजनेला रिझर्व्ह बँकेने अंतिम स्वरूप दिले आहे. बँकेला गंगाजळीची (लिक्विडिटी) उणीव भासणार नाही, अशा पद्धतीने ही योजना आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, एसबीआय आणि इतर बँकांच्या वचनबद्धतेची रिझर्व्ह बँकेकडून लवकरच घोषणा करण्यात येईल. घोषणेनंतर २४ तासांच्या आत या बँका २० हजार कोटी रुपये भागभांडवली आधाराच्या (इक्विटी बेस) स्वरूपात येस बँकेत ओततील. तिसऱ्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील बँका ठेव प्रमाणपत्रांत (सर्टिफिकेटस् आॅफ डिपॉझिट्स) ३० हजार कोटी रुपये गुंतवतील. त्यानंतर, चौथ्या दिवशी येस बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध (मोरॅटोरियम) उठविले जातील. गुंतवणूकदार बँकांकडून होकार मिळताच या योजनेची कुठल्याही क्षणी घोषणा केली जाऊ शकते.
एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी येस बँकेच्या भागभांडलात (इक्विटी) गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत. या गुंतवणुकीमुळे येस बँकेची ऋणपात्रता वाढेल. येस बँकेला कर्ज देणे इतर बँकांना सुलभ होईल. सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रांत गुंतवणूक करणार आहेत. ही गुंतवणूक बँकांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग बनेल. ज्या बँका भागभांडवलात गुंतवणूक करतील, त्यांना येस बँकेतील ७५ टक्के हिस्सेदारी मिळेल. वाढीव हिस्सेदारीच्या तुलनेत सध्याच्या भागधारकांची हिस्सेदारी एकचतुर्थांश इतकीच होईल.भांडवली मूल्य ५,६00 कोटीबुधवारी येस बँकेचे समभाग मुंबई शेअर बाजारात २८ रुपयांवर म्हणजेच आदल्या सत्रापेक्षा २८ टक्क्यांनी तेजीत होते. या किमतीनुसार बँकेचे भांडवली मूल्य ५,६०० कोटी रुपये आहे. हे मूल्य रिझर्व्ह बँकेच्या योजनेच्या मसुद्यातील मूल्यापेक्षा दुप्पट अधिक आहे.