आतापर्यंत दिल्ली, मुंबईतील शाळा, विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती. परंतू, आज या समाजकंटकांचे धाडस आरबीआयला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यापर्यंत वाढले आहे. नुकतेच गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर रशियन भाषेत धमकीचा मेल आला आहे.
याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्होत्रा यांनी काही दिवसांपूर्वीच आरबीआयचा पदभार स्वीकारला आहे. शक्तीकांत दास यांनी सहा वर्षे ही जबाबदारी सांभाळली होती. मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर या धमकीचा मेल आला आहे. यामध्ये रशियन भाषेचा वापर करण्यात आला आहे. बँकेची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे मुंबई पोलीस झोन १ च्या डीसीपींनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली, मुंबईतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याचे ईमेल येत आहेत. गेल्या महिन्यात तर या समाजकंटकांनी विमानसेवेला लक्ष्य केले होते. यामुळे शेकडो फ्लाईट रद्द करण्यात आली होती. शाळा किंवा विमानाची तपासणी केली असता काहीही सापडत नाही. परंतू, जोखीम पत्करण्यास यंत्रणा तयार नाहीत. यामुळे शाळा बंद ठेवणे किंवा विमान माघारी बोलवून तपास करण्याची काळजी घेतली जाते.