नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत 2000 रुपयांची नवीन नोट चलनस्वरुपात आली. गुलाबी रंगाच्या या नोटेबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. 2 हजार रुपयांच्या या नोटेला अनेकांनी विरोधही केला होता. या नोटेमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाईल, असंही अनेकांचं म्हणणं होतं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटांचा वापर सुरू झाला. एटीएमच्या रांगेतून ही नोट मिळाल्याचं मोठं समाधान खातेदारांना लाभत. मात्र, आता एटीएममधून ही नोट हद्दपार होणार आहे.
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) छोट्या शहरांमधील एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटांचे स्लॉट (कॅसेट) काढले आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये अद्याप हा निर्णय घेण्यात आला नसून भविष्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांच्या स्लॉटच्याजागी बँका 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्लॉटमध्ये वाढ करणार आहेत. बँकांमध्ये आणि बाजारातील चलनात ही नोट उपलब्ध असणार आहे. मात्र, एटीएममधून नोट निघत नसल्याने 2 हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत, असा गैरसमज कुणीही पसरवु नये. उत्तर प्रदेशच्या कानपूरपासून एटीएममधील या नोटांचे स्लॉट काढण्यास सुरुवात झाल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय. 2 हजार रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात साठा, डुप्लीकेट नोटांचे प्रमाण आणि एटीएममधून काढल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटेची सुट्टी रक्कम मिळणे अवघड झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.