नवी दिल्ली : भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना मुदतवाढ देणार नाही, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला असतानाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘सरकार व रिझर्व्ह बँकेचे संबंध परिपक्व आहेत,’ असे विधान केले. जेटली हे मोदी सरकारमधील एक प्रमुख मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त होते. ‘इंडियन वुमन कोर’मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्यात संस्थात्मक संबंध आहेत. हे संबंध खूप परिपक्व आहेत. आम्ही संस्थांच्या सर्वोच्च पातळीवर चर्चा करतो, तसेच एकमेकांच्या मतांना योग्य स्थान देतो. रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी आणखी एक संधी देणार का, या थेट प्रश्नावर उत्तर देण्याचे मात्र जेटली यांनी टाळले. या मुद्द्यावर मीडियात चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राजन यांचा कार्यकाळ यंदाच्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. राजन यांना मुदतवाढीत रस असल्याचे त्यांच्या १३ मे रोजीच्या एका वक्तव्यावरून दिसते. ‘मी कामाचा आनंद घेत आहे. तथापि, अजून खूपकाही करणे बाकी आहे,’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. राजन यांना मुदतवाढ देण्याच्या बाबतीत भाजपात मतभेद असल्याचे दिसून येते. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांना आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून हटविण्याची मागणी केली होती. वेगवान अर्थव्यवस्थामोदी सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक धोरणांमुळे आज भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. यंदा चांगला पाऊस पडल्यास अर्थव्यवस्थेला आणखी गती येईल, असेही त्यांनी म्हटले. जेटली म्हणाले की, आगामी तीन वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेची हीच गती कायम ठेवली जाईल. विशेष म्हणजे जगभरात नरमाईचा कल असताना भारतीय अर्थव्यवस्था तेजीत आहे. ग्रामीण क्षेत्र, रोजगार निर्मिती आणि महागाईवर नियंत्रण या गोष्टींवर सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
आरबीआय-वित्तखाते संबंध परिपक्व - जेटली
By admin | Published: May 17, 2016 4:52 AM