RBI Gold Reserve : सोनं हा सर्वात मौल्यवान धातुंपैकी एक आहे. सोनं खरेदी करण्याची जवळपास सर्वांचीच इच्छा असते. काहीजण दिखाव्यासाठी सोनं खरेदी करतात, तर काहीजण गुंतवणूकीसाठी. हा एक असा धातू आहे, जो आर्थिक अडचणीच्या काळात खूप मदतीला येतो. विशेष म्हणजे फक्त सामान्य लोकच नाही, तर विविध देशही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात.
का केली सोन्याची खरेदी?जगात जेव्हा-जेव्हा भू राजकीय तणाव वाढून शेअर बाजार कोसळतो, हो सोने मदतीला येते. अशाच भू राजकीय अस्थिरतेपासून वाचण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेदेखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहे. RBI ने जानेवारी ते एप्रिल, या 4 महिन्यांत तब्बल 24 टन सोन्याची खरेदी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, RBI ने 2023 मध्ये संपूर्ण वर्षात जेवढे सोने खरेदी केले, त्याच्या जवळपास दीडपट सोन्याची या चार महिन्यात खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आरबीआयने 16 टन सोन्याची खरेदी केली होती.
RBI कडे सध्या सोन्याचा किती साठा आहे?RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार, 26 एप्रिल 2024 पर्यंत RBI च्या परकीय चलनाच्या साठ्याचा एक भाग म्हणून 827.69 टन सोन्याचा साठा आहे, जो डिसेंबरच्या अखेरीस 803.6 टन होता. विशेष म्हणजे, चीननंतर भारत हा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. देशात दरवर्षी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. मात्र, आरबीआयने सोन्याचा साठा वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
रिझर्व्ह बँक सोन्याची खरेदी का करते?रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या आर्थिक स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या उद्देशाने सोने खरेदी करते. जगभरातील व्यवसाय अमेरिकन डॉलरमध्ये केले जातात. अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यास आरबीआयकडे असलेले डॉलरचे मूल्यही कमी होते. पण सोन्याच्या किमती डॉलरच्या तुलनेत स्वतंत्र असतात, त्यामुळे सोन्यात केलेली गुंतवणूक ही आरबीआयसाठी 'सुरक्षित गुंतवणूक' आहे. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता कायम आहे. जगातील अनेक देशांमध्ये महागाई आणि मंदी आणि काही देशांमधील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामुळे आरबीआय त्याच्या खरेदीवर भर देत आहे.