सध्या महागाईची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे किरकोळ महागाईचे आकडे दोन दिवसांपूर्वी आले आहेत. ज्यामध्ये किरकोळ महागाईचा दर सलग दुसऱ्या महिन्यात ६ टक्क्यांच्या खाली राहिला आणि एका वर्षातील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे सरकारसह आरबीआयलाही दिलासा मिळाला आहे. आता महागाईच्या टार्गेटबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सध्या ४ टक्क्यांच्या टार्गेटसह त्यात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही. यावर विचार केला गेला तर ती खूप घाई ठरेल, असे ते म्हणाले.
टार्गेटमध्ये बदल घाई ठरेल
महागाईच्या टार्गेटमध्ये काही बदल करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. यामध्ये कोणत्याही बदलाचा विचार करणे खूप घाईचे ठरेल, असे एका कार्यक्रमाला संबोधित करताना दास म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सध्या ४ टक्क्यांच्या टार्गेटला एक अर्थ आहे. नियमांनुसार महागाई २ ते ६ टक्क्यांच्या बँडमध्ये ४ टक्क्यांच्या टार्गेटसह ठेवण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली आहे. यासाठी आरबीआयला सातत्याने व्याजदरात वाढ करावी लागली आहे. मे ते डिसेंबरपर्यंत आरबीआयने रेपो दरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
टार्गेट कमी होऊ शकते
जागतिक स्तरावर महागाईच्या टार्गेटमध्ये घट होऊ शकते, परंतु त्याच्या टार्गेटमध्ये कोणताही बदल खूप घाई ठरू शकते. २०१६ ते २०२० मधील महागाईचे सरासरी सीपीआय आकडे पाहता, ते ४ टक्क्यांच्या जवळ ठेवण्यात आले आहे, असे दास म्हणाले. प्रमुख महागाई अजूनही ६ टक्क्यांच्या आसपास दिसत असून ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले. याला सामोरे जाण्यासाठी आरबीआयने अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या प्रमुख महागाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही दास यांनी नमूद केलं.