गेल्या काही महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत. रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीच्या बैठकीत यात कोणतीही कपात केली नव्हती. परंतु आता लोकांना रेपो दरात कपात होऊन व्याजदर कमी होतील अशी अपेक्षा आहे. ईएमआय स्वस्त होण्याची आशा करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करणार नाही. चालू वर्षात व्याजदरात कपात करण्याच्या अटकळींदरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचं म्हणाले. महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचं आमचं लक्ष्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.
व्याजदर कपात करणे सध्या आमच्या अजेंड्यात समाविष्ट नाही. यावर सध्या कोणतीही चर्चा नसल्याचं ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना शक्तीकांता दास म्हणाले. महागाईचा दर ४ टक्क्यांच्या पातळीवर आणणे हे आमचं सर्वात मोठं लक्ष्य आहे. आम्ही चार टक्के महागाई दराकडे वाटचाल करत आहोत. जोपर्यंत महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत व्याजदर कपातीची चर्चा करणं निरर्थक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रशिया युक्रेन युद्धाचा परिणामरशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाईचा दर ७.८ टक्क्यांवर पोहोचला होता. आता तो आरबीआयच्या २ ते ६ टक्क्यांच्या लक्ष्यादरम्यान आला आहे. मात्र ते ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं आरबीआयचे लक्ष्य आहे. डिसेंबर २०२३ च्या जाहीर केलेल्या किरकोळ महागाई दरानुसार, डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर वाढून ५.६९ टक्के झाला आहे, जो नोव्हेंबरमध्ये ५.५५ टक्के होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गोल्डमॅन सॅक्सनं काय म्हटलं?
अमेरिकन इनव्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सच्या अर्थशास्त्रज्ञांचा विश्वास आहे की भारतीय रिझर्व्ह बँक २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीपासून (जुलै ते सप्टेंबर) व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल. याआधी गोल्डमन सॅक्सने चौथ्या तिमाहीपासून व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली होती.