रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक आज संपन्न झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देत रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती.
आजच्या वाढीसह, रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीपूर्वी रेपो दर 5.40 टक्के होता. कोरोना विषाणूची महासाथ आणि रशिया युक्रेन युद्धानंतर निरनिराळ्या देशांच्या केंद्रीय बँकांच्या आक्रमक आर्थिक धोरणांमुळे आणखी एक वादळ उठले असल्याचं मत दास यांनी यावेळी व्यक्त केलं.
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा कमी होती, तरीही 13.5 टक्के आहे आणि कदाचित प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे, असे दास यावेळी म्हणाले.
जीडीपी वाढीचा अंदाजरिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) साठी आपला GDP वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. "आज महागाई 7 टक्क्यांच्या आसपास आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ती 6 टक्क्यांवर राहील अशी आमची अपेक्षा आहे," असे दास म्हणाले. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"