Join us

Shaktikanta Das: “देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत, कोणत्याही आव्हानासाठी सक्षम”: शक्तिकांत दास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 9:36 AM

Shaktikanta Das: देशातील बँकांच्या सक्षमतेमुळे भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. मात्र, आता हळूहळू देश पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी मोठा दावा केला आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असून, कोणत्याही आव्हानासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. उद्योग महासंघाच्या (सीआयआय) बैठकीत ते बोलत होते. 

देशातील बँकांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध असून, त्यांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) ६.५ टक्क्यांवर या नीचांकी पातळीवर रोडावले आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या उद्भवल्या असतानाही, बँकांच्या या सक्षमतेमुळे भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. 

चालू खात्यातील तूटदेखील आटोक्यात

देशाकडे पुरेशी परकीय गंगाजळी उपलब्ध असून चालू खात्यातील तूटदेखील आटोक्यात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची गरज भागविण्यासाठी आणि तरलता योग्य पातळीवर राखण्यासाठी गेल्या दोन वर्षांत मध्यवर्ती बँकेने १७ लाख कोटींचा निधी अर्थव्यवस्थेत प्रवाहित केला आहे, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून, रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणाऱ्या विविध ६० प्रकारच्या उच्च-वारंवारता निर्देशकांचा नियमितपणे मागोवा घेतला जातो. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र अक्षय्य ऊर्जा स्रोतांकडे देशाचे वेगाने वळण सुरू आहे.

दरम्यान, एलआयसी आयपीओबाबत बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की, देशाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा IPO असेल. LIC च्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के राखीव आहेत आणि किरकोळ विभागाकडून मिळणारा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. चालू आर्थिक वर्षात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागातही मोठी वाढ झाल्याचे ते म्हणाले. याशिवाय भारताचा वाढीचा अंदाजही ८.९ टक्के आहे. महागाई दर वाढण्याची शक्यता नाही, असे दास यांनी नमूद केले.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास