नवी दिल्ली : तुम्ही एटीएममधून (ATM) पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता एटीएम कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी ही घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सुविधा काही बँकांमध्येच उपलब्ध होती.
कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाईल. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. तसेच, यूपीआयच्या (UPI) माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतात, असेही त्यांनी सांगितले.
फसवणूकही कमी होईलरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, या उपक्रमामुळे कार्ड क्लोन करून पैसे काढण्याची फसवणूकही कमी होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण (RBI Monetary Policy) समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.
रेपो दरात कोणतेही बदल नाहीतदरम्यान, एमपीसीने (MPC) पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट बदललेला नाही. रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35% एवढाच ठेवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात बदल न करण्याची ही सलग 11वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.
जीडीपीमध्ये कपातबँकेने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आपला GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्के ठेवला आहे. त्याच वेळी, रिझर्व्ह बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. 7.8 टक्क्यांवरून तो 7.2 टक्के ठेवण्यात आला आहे. यासोबतच कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलर असा अंदाज आहे आणि या आर्थिक वर्षासाठी सरासरी महागाईचा अंदाज ५.७ टक्के ठेवण्यात आला आहे. हा महागाई दर एप्रिल-जूनमध्ये ६.३ टक्के तर जुलै-सप्टेंबरमध्ये ५.० टक्क्यांवर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.