Join us

‘रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे असावी’

By admin | Published: August 03, 2016 4:28 AM

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे आहे, तर बँक आॅफ इंग्लंडच्या गव्हर्नरचा कालावधी आठ वर्षांचा असतो.

नवी दिल्ली : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे आहे, तर बँक आॅफ इंग्लंडच्या गव्हर्नरचा कालावधी आठ वर्षांचा असतो. जगभरात सर्वत्र मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची मुदत पाच ते सहा वर्षे असून, भारतातही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत चार वर्षे करावी, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य राजीव शुक्ला यांनी राज्यसभेत केली.शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना ते म्हणाले की, रघुराम राजन यांच्याबाबतीत उलटसुलट विधाने करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळ घातला. मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखाबाबत असे करणे योग्य नाही. भारतात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुदत तीन वर्षे असून, त्यांना आणखी एकदा मुदतवाढ देण्याची तरतूद आपल्याकडे आहे. अन्य देशांप्रमाणे पाच ते आठ वर्षे गव्हर्नरचा कालावधी ठरवणे शक्य नसले तरी ती मुदत किमान चार वर्षे करणे योग्य ठरेल.रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कोण असावा, त्याची शैक्षणिक व अन्य पात्रता काय असावी, याविषयीही स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे कधी अर्थतज्ज्ञ, कधी आयएएस अधिकारी तर कधी बाहेरचीच व्यक्ती गव्हर्नर बनू शकते. हे योग्य नाही. त्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित करणे आवश्यक असून, त्यात शैक्षणिक पात्रता आणि अन्य बाबींचा समावेश असायलाच हवा, असे खा. शुक्ला म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)