रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात मोठी वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेतली. 2 मे आणि 4 मे रोजी झालेल्या आरबीआयच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि त्यात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच काळापासून रेपो दरात वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी रेपो दर ४ टक्के होता, तो आता ४.४० टक्के होईल, असे दास म्हणाले. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. अनियंत्रित महागाईमुळे एमपीसीने हा निर्णय घेतला.
मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि 7 टक्क्यांवर पोहोचली. किरकोळ महागाई, विशेषत: अन्नधान्याच्या दरवाढीमुळे झपाट्याने वाढली आहे. याशिवाय भू-राजकीय तणावामुळेही महागाई वाढली आहे, असे दास म्हणाले.
या व्याज दरवाढीमुळे कर्जाच्या हप्त्यांतही वाढ होणार आहे. रेपो दरात शेवटची कपात मे 2020 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून तो तसाच ठेवण्यात आला होता. कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 50 bps ने वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे व्याजदरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. एफडी गुंतवणूकदारांना या वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आहे.