नवी दिल्ली: नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून तो 6.50 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांची वाढ नोंदवून तो 6.25 टक्क्यांपर्यंत गेला आहे. आर्थिक विकासाला गती देण्याचं कारण देत व्याजदरात वाढ करण्यात आली असून, आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी हे पतधोरण जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्याचा भार बँकांकडून सामान्य ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. याचा फटका कर्जदारांना बसेल. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तीक कर्जाचा हफ्ता वाढेल. ईएमआय वाढल्यानं त्याची झळ ग्राहकांना बसेल.
ईएमआय किती आणि कसा वाढणार?
उदाहरणार्थ, तुम्ही बँकेकडून 20 लाखांचं कर्ज 20 वर्षांसाठी घेतलं असेल, तुम्हाला हे कर्ज 8.40 टक्के दरानं मिळालं असेल, तर आता तुमचा ईएमआय 17,230 रुपये इतका आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये पाव टक्क्यानं वाढ केली आहे. त्यामुळे तुमच्या बँकेनंही कर्जदरात वाढ केली, तर तो 8.65 टक्के इतका होईल. मग तुम्हाला 17 हजार 230 रुपयांऐवजी 17,547 रुपये ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 317 रुपये जास्त भरावे लागतील.
तुमच्या खिशावर किती भार? (सर्व गृहकर्जांचा कालावधी 20 वर्षे)
कर्ज सध्याचा ईएमआय संभाव्य ईएमआय खिशावर पडणारा भार
15 लाख 12,922 13,160 238
16 लाख 13784 14,037 253
17 लाख 14646 14915 269
18 लाख 15507 15792 285
19 लाख 16369 16669 300
20 लाख 17,230 17,547 317
21 लाख 18,092 18,424 332
22 लाख 18,953 19,301 348
23 लाख 19,815 20,179 364
24 लाख 20,676 21,056 380
25 लाख 21,538 21,934 396
रेपो रेट म्हणजे काय?
बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, तोच रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचं कर्जही महाग होतं आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ; 'असा' पडू शकतो तुमच्या खिशावर भार
रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानं बँका गृह कर्जदरात वाढ करण्याची दाट शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 05:21 PM2018-08-01T17:21:02+5:302018-08-01T17:24:50+5:30