रिझर्व्ह बँकेनं (RBI) २४ नोव्हेंबर रोजी सिटी बँक (Citibank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि इंडियन ओव्हरसीज बँकेवर (Indian Overseas Bank) दंड ठोठावला. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेनं सिटी बँकेला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर बँक ऑफ बडोदाला ४.३४ कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या वेगवेगळ्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ (बीआर कायदा) चे उल्लंघन आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सिटी बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
बँक ऑफ बडोदाला लार्ज कॉमन एक्सपोजरशी संबंधित केंद्रीय राखीव निधीच्या निर्मितीशी संबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ४.३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे दुसर्या निवेदनात म्हटलं आहे. चेन्नईच्या इंडियन ओव्हरसीज बँकेला कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन प्रकरणांमध्ये नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे आणि बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आपला उद्देश नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.