मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेनं ५.१५ टक्के इतका रेपो रेट कायम ठेवला आहे. सध्या ४.९० टक्के असलेल्या रिव्हर्स रेपो रेटमध्येही आरबीआयनं बदल केलेला नाही. देशाचा विकास दर गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी पातळीवर असल्यानं रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये बदल करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र रिझर्व्ह बँकेनं सगळ्यांच्या अपेक्षांना धक्का देत रेपो रेट जैसे थे ठेवला आहे.याआधी आरबीआयनं सलग पाचवेळा रेपो रेटमध्ये कपात केली होती. विकास दराचा वेग कमी झाल्यानं आरबीआय रेपो रेटमध्ये आणखी कपात करेल, असा अंदाज अर्थ वर्तुळातील अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र या सगळ्यांच्या अपेक्षांना रिझर्व्ह बँकेनं धक्का दिला आहे. याशिवाय आरबीआयनं जीडीपीच्या विकास दराचा अंदाजदेखील कमी केला आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ५ टक्के इतका असेल, असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. याआधी आरबीआयनं विकास दर ६.१ टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीसदृश्य वातावरण आहे. एप्रिल-जून या तिमाहीत देशाच्या विकास दराचा वेग ५ टक्के इतका होता. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत त्यात आणखी घट होऊन तो ४.५ टक्क्यांवर आला. गेल्या सहा वर्षांमधील हा निच्चांक आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये बदल न केल्याचा परिणाम लगेचच शेअर बाजारात दिसून आला. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स वर गेला होता. पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्स जवळपास ४१ हजारांवर पोहोचला होता. मात्र पतधोरण जाहीर होताच तो जवळपास २०० अंकांनी खाली आला.