Join us

क्रिप्टो करन्सी विरोधात आरबीआय आणणार डिजिटल करन्सी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 9:38 AM

क्रिप्टो करन्सीने (ऑनलाइन आभासी चलन) नियमित चलनास निर्माण केलेला धोका रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक स्वत:ची डिजिटल करन्सी आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : क्रिप्टो करन्सीने (ऑनलाइन आभासी चलन) नियमित चलनास निर्माण केलेला धोका रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक स्वत:ची डिजिटल करन्सी आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी ही माहिती दिली.

एका वेबिनारमध्ये बोलताना रविशंकर यांनी सांगितले की, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या खासगी क्रिप्टो करन्सीला पर्याय देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (सीबीडीसी) विकसित केली जात आहे. त्यातून लोकांत रुपयाला असलेले प्राधान्य कायम राहण्यास मदत होईल. तसेच खासगी क्रिप्टो करन्सीच्या अस्थिरतेपासून लोक वाचू शकतील.

रविशंकर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही क्षेत्रात लवकरच सीबीडीसीचा पथदर्शक प्रकल्प राबविला जाऊ शकतो. प्रत्येक संकल्पनेला आपला काळ येईपर्यंत वाट पाहावी लागते. सीबीडीसीची वेळ आता आली आहे, असे वाटते.

रविशंकर यांनी सांगितले की, डिजिटल करन्सीच्या अनेक बाबतीत आम्ही अभ्यास केला आहे. तसेच अजूनही तो सुरूच आहे. हे आधुनिक चलन किरकोळ अदायगीसाठीच (रिटेल पेमेंट्स) असावे की घाऊक अदायगीसाठीही (होलसेल पेमेंट्स) त्याला परवानगी असावी, त्याची खातेवही (लेजर) विकेंद्रित असावी की केंद्रित, ते प्रतीकात्मक असावे की लेखाधिष्ठित असावे.

- रविशंकर यांनी सांगितले की, जगातील ८६ टक्के केंद्रीय बँका डिजिटल चलनावर सक्रिय अभ्यास करीत आहेत. 

- ६० टक्के केंद्रीय बँकांनी नव्या तंत्रज्ञानावर प्रयोग सुरू केले आहेत, तर १४ टक्के केंद्रीय बँका यासंदर्भात पथदर्शक प्रकल्प राबवित आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक