Join us

RBI चे 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च; बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 6:13 PM

RBI Launches UDGAM: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च केले असून, याद्वारे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.

UDGAM Web Portal Launches: देशातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर कुणीही दावा केलेला नाही. पण, आता सामान्य लोकांसाठी या ठेवी शोधणे सोपे होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उद्गम (UDGAM) नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे, ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधू शकते.

RBI ने एक प्रेस रिलीज जारी करुन सांगितले की, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आरबीआयद्वारे विकसित, हे वेब पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सामान्य लोकांना स्वत: किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी शोधता येतील. 6 एप्रिल 2023 रोजी, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली होती. 

दावा न केलेल्या ठेवींचा वाढता ट्रेंड पाहता आरबीआयने त्यावर दावा करण्यासाठी जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांनी दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्यासाठी त्यांना संबंधित बँकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. Udgam (अनक्लेम डिपॉझिट्स - गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन) वेब पोर्टलद्वारे दावा न केलेले ठेव शोधता येणार आहे. तसेच, संबंधित बँकांना भेट देऊन ते खाते पुन्हा सक्रिय करता येतील.

आरबीआयने सांगितले की, सध्या 7 बँकांमध्ये दावा नसलेल्या ठेवी आहेत, ज्यांचे तपशील वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. इतर बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचे तपशील 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोर्टलवर अपलोड केले जातील. अलीकडेच सरकारने संसदेत सांगितले होते की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 31 मार्च 2023 पर्यंत 36,185 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी हस्तांतरित केल्या आहेत. 

या बँकांमधील ठेवी पाहता येणार

  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • पंजाब नॅशनल बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • धनलक्ष्मी बँक लिमिटेड
  • साउथ इंडियन बँक लिमिटेड
  • डीबीएस बँक इंडिया लिमिटेड
  • सिटी बँक
टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकगुंतवणूकपैसाबँक ऑफ इंडिया