मुंबई : आगामी पतधोरण जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँक एकावेळी कर्जाची फेररचना करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय हवाई वाहतूक आणि आतिथ्यशीलता (हॉस्पिटॅलिटी) या २ क्षेत्रांना बँकेकडून काही सवलती मिळण्याची अपेक्षा आहे.
गुरुवार, दि. ६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार आहे. यामध्ये उद्योगांना एकवेळी कर्जाची फेररचना करण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत. कोरोनाच्य साथीमुळे अर्थव्यवस्था थांबली असली तरी हवाई वाहतूक आणि आतिथ्यशीलता या २ क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रांना मदतीचा हात देण्यासाठी बँकेकडून काही योजना जाहीर होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.